रविवार, १२ जून, २०११

आज शेवटी पोस्ट लिहायचा मुहूर्त सापडला....सेमिस्टर संपली तसा मी भारतात १ महिना जाऊन आलो....आधी विचार होता कि तिकडे जाऊन एखादे तरी पोस्ट टाकावे...जे कुकविले मध्ये करतो ते पुण्यात करून काय फायदा असे म्हणून टाळले गेले....एकडे टेनेसीला आल्यापासून मास्टर च्या थेसिस ची गडबड चालू झाली त्यामुळे त्यात १ आठवडा गेला....खूप फोटो काढले होते ते शेवटी सांगयला लागले कि बाबा आत्ता तरी आम्हाला पोस्ट कर...!

भारतात पहिल्यांदा गेलो त्यामुळे जास्त भटकंती केली नाही....फक्त एकदा मुंबई ला गेलो....तसा म्हणता माझा जन्म ठाण्याचा (म्हणजे अर्धा मुंबईकर)पण अशी मुंबई ती फिरणे झाले नव्हता...नशिबाने सायलीला मुंबई युनिवर्सिटी चे काम निघाले तिच्या बरोबर माझी स्वारी निघाली... सायली म्हणजे मुंबई ची चालतीबोलती मार्गदर्शक....कुठे काय सही खायला मिळते त्यापासून कुठली इमारत कितीसाली कोणी बांधली (स्थापत्य शास्त्राची पदवीधर ते पण जे.जे मधून !)याची तिला बेक्कार माहिती....त्यामुळे सकाळी दादर -कुलाबा -सांताक्रूझ-कुर्ला-जेजे असे मुंबई दर्शन झाले...त्यात माझा कॅमेरा आणि तिचे तोंड कायम चालू होते (फोटो मध्ये आवाज रेकॉर्ड व्हायला पाहिजे होता ...)







जीवाची मुंबई ...उन्हाळ्यात ती पण माझ्या कॅमेरात !

आज शेवटी पोस्ट लिहायचा मुहूर्त सापडला....सेमिस्टर संपली तसा मी भारतात १ महिना जाऊन आलो....आधी विचार होता कि तिकडे जाऊन एखादे तरी पोस्ट टाकावे..."जे कुकविले मध्ये करतो ते पुण्यात करून काय फायदा" असे म्हणून टाळले गेले....एकडे टेनेसीला आल्यापासून मास्टर च्या थेसिस ची गडबड चालू झाली त्यामुळे त्यात १ आठवडा गेला....खूप फोटो काढले होते ते फोटोच शेवटी सांगयला लागले कि बाबा आत्ता तरी आम्हाला पोस्ट कर...!

भारतात पहिल्यांदा गेलो त्यामुळे जास्त भटकंती केली नाही....फक्त एकदा मुंबई ला गेलो....तसा म्हणता माझा जन्म ठाण्याचा (म्हणजे अर्धा मुंबईकर !)पण अशी शांतपणे मुंबई ती फिरणे झाले नव्हते ...नशिबाने सायलीला मुंबई युनिवर्सिटी चे काम निघाले तिच्या बरोबर माझी स्वारी निघाली... सायली म्हणजे मुंबई ची चालतीबोलती मार्गदर्शक....कुठे काय सही खायला मिळते त्यापासून कुठली इमारत किती साली कोणी बांधली (स्थापत्य शास्त्राची पदवीधर ते पण जे.जे मधून !)याची तिला बेक्कार माहिती....त्यामुळे सकाळी दादर -कुलाबा -सांताक्रूझ-कुर्ला-जेजे असे मुंबई दर्शन झाले...त्यात माझा कॅमेरा आणि तिचे तोंड कायम चालू होते (अजूनही मला फोटो बघताना तिचा आवाज ऐकू येतो....;))


दक्षिण मुंबई मध्ये रस्त्यवरून फिरताना अनेक जुन्या इमारती लक्ष वेधून घेत होत्या....मी तर किती तर वेळ वेडा होऊन बघतच बसलो होतो....प्रत्येक इमारतीचा एक इतिहास होता तरीसुद्धा त्या वर्तमानाला तोंड देत उभ्या होत्या....अगदी जुन्या पारशी बाबा सारख्या,...



मधेच ही १०० कोटी ची इमारत दिसली....एकदा माझ्या एका अमेरिकन मित्राला मी त्याबद्दल सांगत होतो (तेंव्हा मला त्या इमारतीचा फुल अभिमान वगैरे वाटत होता !)तो म्हणाला "असेल १०० कोटीची पण याचा तुमच्या देशातील सामान्य लोकांना उपयोग काय..?" माझ्या कडे काहीच उत्तर नव्हते...



या किल्ल्यावाल्याकडे बघून मला एक नेहमी प्रश्न पडतो कि "हे कुठली पण किल्ली बनवू शकतात मग चोरीचे-घरफोडीचे विचार करत असतील का ?" पण बहुतेक त्यांनी पण स्पायडरमॅनचे बोलणे ऐकले असणार "great power comes with great responsibility !"



हा आहे दादरचा कबुतरखाना ! माझी आई दादरची ..तिचे सगळे बालपण शिवाजीपार्कच्या समोर केशवभुवन मध्ये गेले...त्यामुळे दादर मधून जात असताना "आई एकडे लहानपणी गेली असेल का ?"या विचाराने मला वेडावून सोडले होते...




माझी आई बँक ऑफ इंडिया मध्ये २५ वर्षापेक्षा जास्त नोकरी करते आहे....तिच्या साठी हा फोटो काढून आणला कारण याच इमारती मधून तिने कॉलेजनंतर नोकरी चालू केली होती...



या इमारतीचे दगड म्हणा किंव्हा texture म्हणा मला मोहून टाकत होते....माझी अन्न्दाती बँक म्हणून फोटो सहज खपून जाईल....



Taxi मधून ५० kmph ला काढलेला फोटो येवढा चांगला येईल असे वाटले नव्हते....हाजी-अली चा दर्गा !



हा फुटपाथ आहे या वरती माझा आधी विश्वासच बसत नव्हता....आत्ताच्या काळात पण रस्ते वाढवण्याच्या क्रेझ मध्ये पण तो टिकून राहिला हेच मुंबई चे वैशिष्ट्य आहे...




"लव्ह केलिये साला कुच भी करेगा !" वरळी सी-लिंक



क्रॉफर्ड मार्केट ....एवढ्या गर्दी गोंधळा मध्ये मी शांत झालो आणि click केले...आकाश पण सही होते आणि कॅमेराने पण साथ दिली..



१८६३ मध्ये हे वाचनालय चालू झाले...David Sassoon याने त्याकाळी ६०००० रुपयाची देणगी दिली म्हणून हे वाचनालय उभे राहिले...मुंबई चा हा असा इतिहास तिथल्या लोकांमुळे कधी इतिहास वाटलाच नाही...




सायलीने माहिती पुरवली जे डावीकडे दिसते आहे ते वाटसन होटेल आणि उजवी कडचा राजाभाई टॉवर ...आणि मी direct १५ वर्ष मागे पोहचलो....बाबा मला मुंबई दाखवायला घेऊन यायचे "राणीचा बाग,prince of wales museum,म्हातारीचा बूट, getway of India असे करत आम्ही बेस्ट मधून मुंबई फिरायचो..

गंधर्व .. !!

महिन्याच्या दुसऱ्या शनिवार-रविवारची मला सुट्टी असल्याने आज बाबांनी देखील रजा घेतली. सकाळी उठल्यावर गप्पांमध्ये दिवसाचे आराखडे होता होता एक महिना झाला  घरच्यांबरोबर बघायचा ठरवलेला "बालगंधर्व" सिनेमाला जायचं ठरलं. गरम मिसळ आणि दुपारच्या पडीनंतर ५.३० च्या खेळाची तिकीटे काढली. आम्ही बरेच आधी पोचल्यामुळे आमच्या गप्पांमधून पण लोकांच्या गप्पांकडे लक्ष जात होतं. अगदी " family movie" आहे हो, बघितलाच पाहिजे असे म्हणत बरेच तिथे जमले होते.

बाबा मुळात कलाप्रेमी असल्याने मी विषयाशी पूर्णपणे परिचित होते. इतके दिवस जेव्हा कधी विषय निघायचा तेव्हा बाबा भरभरून बोलायचे. त्यांना कुठे थांबवायचे का नाहीच असा प्रश्न आई आणि मला पडायचा. त्यांच्या डोळ्यात चमकणाऱ्या त्या कलाप्रेमाने त्या बोलण्याला अजून उठाव यायचा. घरातल्या ३०० हून अधिक संगीताच्या कॅसेट्स व त्याहून कित्येक अधिक पुस्तके वाचून जमलेला तो ठेवा मला ते देऊ पाहतात. खोलवर अभ्यास नसला तरी चालेल पण अंगातलं रसिकत्व जप असं नेहमीच ते सांगत आले. रक्ताने जोडलेले आम्ही, ही शिकवण मुरायला जास्त वेळ लागला नाही. थोडेफार गाता व synthesizer वाजवता येते पण त्यावर प्रभुत्व मिळवण्याचा मानस राहिला तो राहिलाच.

आजच्या reality shows मध्ये उठलेला कलेचा बाजार बघता मनोमन चीड येते. पण संसार चालवायचा म्हणजे लागणारा पैसा मिळवण्याचे तो एकमेव पर्याय उरल्यासारखे वाटते. डोक्याला निर्मळ आनंद देण्यापेक्षा कलकलच जास्त होते. अशावेळी आपले संपूर्ण आयुष्य रसिकांसाठी वाहून घेणाऱ्या गंधर्वांची महानता कळते की आदर वाटतो नीट समजत नाही.  भामिनीचा खानदानीपणा जपण्यासाठी तडफडणाऱ्या त्या जिवाच्या गोष्टी ऐकताना व आज सिनेमात समोर बघताना ते कलेवरचे वेडे प्रेम बघून अंगावर काटा आला. त्या वेळचे पुणे, कोल्हापूर, तो रंगमंच जणू त्या पडद्याऐवजी उभा केला होता.

दोन तास नेत्रसुख आणि भावना यात गुरफटलेल्या अवस्थेतच आम्ही स्तब्ध होतो. थिएटर बाहेर पडता पडता लोकांच्या टिपण्या परत लक्ष वेधून घ्यायला लागल्या. "काय कॅमेरा वापरलाय हो, सुबोधने काय झकास काम केलंय, मध्यंतरानंतर जरा रडवेला होता, यंदा सगळे अवार्ड सुबोध नेणार नक्की." सिनेमाच्या शेवटच्या ओळी संपायच्या  आधीच बाहेर चालू लागणाऱ्या ठकांची चीड येत होती. आम्ही २०-३० जण अजून ते जुने फोटो बघत असताना देखील ह्यांची बडबड सुरूच. हा सिनेमा केवळ एक entertainment आहे ह्यासाठी किती लोक आले होते आणि किती खरंच गंधर्वांच्या आयुष्यनाट्यात सामील व्हायला आले होते कुणास ठाऊक. सिनेमाचा पूर्ण वेळ बाजूला वेफर्स खाणारी मुले व पुढे ऑफिसमधल्या गप्पा मारणाऱ्या त्या बापाला ओरडून सांगावेसे वाटले घरी जाऊन काय ते टाळ पिटा !

घरच्यांना असलेल्या ज्ञानामुळे व रसिकत्वामुळे ह्या चित्रपटाची खोली मला जाणवू शकली. लहानपणापासून ह्या गोष्टी कानावर पडल्याने हा ठेवा ५०% का होईना मी माझ्या पुढच्या पिढीला देऊ शकते. सिनेमात केवळ एक व्यक्तिरेखा साकारून सुबोधवर नकळत कलेने कित्येक संस्कार रुजवले असतील. त्यावर तो आपले पुढचे जीवन सार्थकी लावेलाच यात शंका नाही. पण मनात विचार येतात. त्या वेफर्स खाणाऱ्या मुलाला काय कळला असेल हा चित्रपट? ऑफिसच्या गप्पात बुडालेल्या त्या आईवडलांना सिनेमाची खोलाई जाणवत नाही तर त्या पुढच्या पिढीला कुठून उमगणार. कलेचा होणारं ऱ्हास तो हाच का नकळत वाटून गेले. विद्या आणि कलेचे माहेरघर अजून किती दिवस हे जपू शकणार हा प्रश्न आहे.

घरच्यांमुळे रुजलेले रसिकत्व आज कुठे तरी सुन्न झाले. ज्या बालगंधर्वांच्या सिनेमाचा आज गाजावाजा चालला आहे त्यांचे पुण्यातले अर्धवट पडके घर अजूनही कसाबसा हा पावसाळा झेलू पाहते आहे याचे वाईट वाटते...

शुक्रवार, ३ जून, २०११

पाऊस असा रुणझुणता..

पाऊस काय सुरु झाला फेसबुक वर स्टेटस अपडेट करायला लोकांना अगदी ऊत आला.. मी पण काय त्यात कोणी वेगळी नाही. फरक फेसबुक ऐवजी फक्त ब्लॉगचा आहे. गेले काही दिवस लिहायला वेळ झाला नाही. पण आज थोडसंच का होईना पण लिहण्यावाचून राहवलं नाही.

साडेचार वर्षानंतर आज पुण्यातला पाउस अनुभवतेय. साईट वर जाताना सर बोलून गेले आज पाऊस पडणार. रणरणत्या उन्हात पुणे विद्यापीठाची मंडळी आमचं काम बघायला साईटवर येणार होती. सगळं नीट पार पडलं तसे मी आणि सर ऑफिस कडे परत निघालो. तोपर्यंत ढगांनी आपले रंग बदलले होते. त्यात पाषाण रस्त्याने स्वतःचा एक नवीनच कॅनवास रंगवला होता. दोन्ही बाजूने गुलमोहोर बहरला होता. त्यात मधे मधे बोगनवेल आपल्या गुलाबी पांढऱ्या छटांमध्ये खुलून दिसत होती.

चांदणी चौक पार केला तसं समोर कोथरूड वर उठलेलं धुळीचं वावटळ दिसलं. सरांनी गाडीचा वेग वाढवला. गाडीत दोन प्रोजेक्टची कागदाची मॉडेल असल्याने त्यांना पावसापासून वाचवणं जास्त महत्वाचं होतं. गाडी ऑफिसखाली आली तसे पटापट आम्ही मॉडेल खाली उतरवले आणि लिफ्ट कडे धाव घेतली. गाडी पार्किंग मधे घातली तेवढ्यात वरचं झाड कोसळलं. पण आमची धावपळ कामी आली. आत पाऊल ठेवलं आणि समोर सगळे कागद भिरभिर उडत होते आणि खिडक्या लावायला सगळे पळत होते. गरम चहाची ऑर्डर सोडली. नंतर ओघानेच सगळी पावसाची गाणी सगळ्यांनी लावली. गप्पा सुरु झाल्या.

आपापल्या कॉलेजच्या आठवणीत सगळे रमून गेले. पहिल्या पावसाच्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या कथा. कोणी सिंहगड तर कोणी लवासा, कोणी मरीन ड्राईव्ह तर कोणी खडकवासला.  गरम गरम भजी असो वा जिलबी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी.. चिखलात फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच. काहीना दुरवर भटकून येण्याची आवड तर काहीना गच्चीवर जाऊन बसण्याची आवड.

कधीतरी साचलेल्या पाण्यापासून गाडी वाचवत स्वतःला सांभाळणारे लोक तर कुठे त्याच पाण्यात उड्या मारणारी बच्चे कंपनी. चिखलातून पाय खाली न टेकवता सरळ गाडी पुढे काढायची कसरत तर कुठे दुसऱ्यावर सुर्रकन पाणी उडवून जाणारया ४ व्हीलर्स. चप्पल कमी नक्षीकाम करेल पण बाईकवाल्यांचे मागचे टायर अफाट कारंज उभे करेल.

मान्सून ट्रेकचे प्लान्स आजकाल ठरवायला लागत नाहीत. गाडी काढून मुळशी गाठायला कोणी मागेपुढे पाहत नाही. कितीही दरड कोसळली तरी माळशेज आपला दुधसागरने सर्वांना बोलावतच राहतो. कोकण रेल्वेचा प्रवास फक्त निसर्गदर्शनासाठी केला जातो. कितीही उसळल्या लाटा तरी समुद्राकडे जाववून राहवत नाही.

पावसाकडे शून्यात बघत जुन्या आठवणी ताज्या होतात. पाऊस असा रुणझुणता.. सलीलचे गाणे साद घालते.. हिंदी मराठी इंग्लिश सगळी पावसाची romantic गाणी playlist मधे आपली जागा बनवतात.

आणि यात ऐन पावसात महानगरपालिका रस्त्यांची कामं काढणार. परत आता रस्त्यावर खड्डे वाढणार, चिखलात चाक फसणार, विजा कडकडणार,झाडं पडून खांब पडणार, तासन तास लाईट जाणार, कामाच्या वेळी धो धो वरुणराजे कोसळणार, रेनकोटची बटनं टिकणार नाही, ओल्या कपड्यांमधेच काम करायला लागणार, गाडीचे ब्रेक तर लागणारच नाही, पाणी साचून वाहतूक ठप्प होणार.. सरासरीपेक्षा कमीजास्त पाऊस पडणार, हवामानखात्याचे अंदाज नेहमीच चुकणार, कुठे पूर तर कुठे कृत्रिम पाऊस, चिकचिक कधी संपणार नाही.

वर्षोनुवर्षे चालणारे तेच कधीही न बदलणारे चित्र, कितीही वेळा रंगवले तरी बदलणार नाही..