मंगळवार, २९ मार्च, २०११

३२-१

महिन्यातून दोन तीन वेळा तरी पडणारे माझे एक भयानक स्वप्न, भूताला पण मी एवढी घाबरत नाही एवढं. तशी मला झोप खूप प्रिय पण खडबडून जाग आणणारं, रग-चादर-उश्या बाजूला फेकून देऊन तडमडत आरश्यासमोर आ वासून उभं रहायचं आणि तपासायचं, आपले सगळे दात जागेवर आहेत की नाही..
हो, अगदी समोरच्या दातापैकी एक पडल्याच्या या स्वप्नाची मला बेक्कार भीती वाटते. तसा माझा चेहरा हसरा असल्याने त्यात एक खिडकी पडलेली दिसणं कितीही गाढ झोपेतून मला उठायला लावतं.

आमचे नात्याने दूरचे पण तरीही जवळचे जोडपे dentist आहेत. त्यांचं क्लिनिक आमच्या घराजवळच असल्याने बऱ्याचदा भेट होते. पेशंट बनून गेलो नाही इतक्या वेळा गप्पा मारायला गेलो असू. पण पहिल्यांदा वेळ आली बाबांची. त्यांचं root canal करायच्या वेळी. त्यांचा सगळाच प्रकार खूप किचकट असल्याने जवळजवळ एक महिना यात गेला. नक्की root canal करताय की canal खणताय असं सहज मजेत मी त्यांना विचारलं होतं. त्यांनी चिल मधे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, पण ऐकून वाट माझी लागायची. एका वेळी चार dentist लोकांनी आपापले डोके खाजवत हे सगळे शेवटी पार पाडले तरीही आमच्या बाबांचा चेहरा शांत.

पुण्यात आल्यावर आपल्या सगळ्या नातेवाईकांना मला भेटवणे आमच्या बाबांचा आवडता छंद. माझे thesis झाल्यानंतर सुट्टीत सहज परत ताई कडे जायचा योग आला.पण नंतर इंटर्नशिपमुळे जवळ जवळ तीन महिने भेटणं झालं नाही.

दोन दिवसापूर्वी शेवटची पूर्ण बाहेर न आलेली अक्कलदाढ जरा त्रास द्यायला लागली. सगळं काही ठीक आहे की नाही ते बघण्यासाठी आम्ही ताई कडे गेलो. आतुन मी थोडीशी घाबरलेलीच होते. पण धीर धरत मी तिच्या क्लिनिक मधे पाऊल ठेवले. एका सर्जरी नंतर हुश्श करत माझा चेहरा बघून ती थोडी सुखावली होती. सध्या काय चालू आहे तेव्हा इंटर्नशिप उत्तर ऐकून तिने माझे अगदी (आनंदाने) प्रोफेशनल स्वागत केले. आई बाबा बरोबर असल्याने साहजिकच गप्पा सुरु झाल्या. काही वेळाने त्या माझ्या भविष्यावर येऊन टपल्या. लग्नाच्या गोष्टी सुरु झाल्यावर "माझी दाढ दुखतेय जरा बघ ना" म्हणत मी विषय बदलला. पण लगेच तिने आपली equipments काढून चेकअपला सुरवात केली. तिच्या लक्षात आले की येणारी दाढ तिरकी येतेय. तिची जागा आणि वाढ बघता पुढे त्रास होणार तर आत्ताच काढून टाकलेली बरी असा सल्ला ताईने दिला.

माझ्यावर टाईम बॉम्ब पडला...

काहीच त्रास होणार नाही, खूप साधी case आहे वगैरे सांगून मला धीर देण्याचा असफल प्रयत्न तिघांनी केला. माझी नकाराची घंटा सुरु झाली. येत्या शनिवारी आटपून टाकू बाबांनी शांतपणे तिला सांगत आम्ही निघालो. ही माझी पहिलीच वेळ असल्याने भीतीने डोळ्यात पाणी टिकेना. खराब मूड सांभाळायला मला वैशाली मधे नेण्यात आलं. आयुष्यात पहिल्यांदा इडली माझ्या घशाखाली उतरत नव्हती. नंतर एका लहान मुलाला देतात तसं icecream पण देण्यात आलं. बरोबरच होतं म्हणा, मी लहान मुलासारखीच वागत होते.

रात्री फोन वर एका मित्राशी बोलताना पण भीती कमी होत नव्हती. पहिले मजेत बोलताना समजवायचा प्रयत्न झाला. तोंडात liquid nitrogen भरून सगळं गोठल्यावर एका बुक्कीत फत्ते.. वगैरे.. पण माझ्या डोक्यात ही भीती फेविकॉल सारखी चिकटली होती. रात्रभर झोप नावाचा प्रकार माझ्या खोलीत फिरकला नाही. खरंतर झोप उडण्याएवढी मोठी गोष्ट नाही ही पण का कुणास ठाऊक माझ्या डोक्यातून हा विचार गेला नाही. काही स्वप्न खरी होतात असं ऐकलंय. तशी बरीच झाली आहेत पण याची भर नसती तर चाललं असतं असं रात्रभर देवाला ओरडून ओरडून सांगावसं वाटलं. सकाळी दात घासताना लवकरच आपली ३२-१ एकतीशी उरणार आहे ते सहनच होत नव्हतं. पण ९०% स्वप्न खरं होणार नसल्याने म्हणजे समोरच्या ऐवजी मागचा एक दात कमी होणार असल्याने जरा हायसे वाटले..

आता शनिवारी वर्ल्ड कप फायनल बरोबर आमची पण लढाई रंगणार आहे. बघू, कशी वाट लागते ते.....

शुक्रवार, २५ मार्च, २०११

पुळचट रिआलिटी शो चा शो ऑफ !!!!!

एकडे टेनेसी आल्यापासून माझे टीव्ही पाहणे खूप कमी झाले आहे...म्हणजे मी भारतात असताना जास्त बघायचो असे नाही....पण animal planet,Nat Geo आणि Discovery यात बेक्कार जास्त रमायचो...येथे या वाहिन्यावरती कुत्रे आणि मांजरांचे सगळे कार्यक्रम असतात त्यामुळे माझ्या सारख्या जंगली प्राण्याला ते पाळीव कार्यक्रम बघवत नाहीत....

दुसऱ्या वाहिन्यांवर "रिआलिटी शो" नावाचे भयानक प्रकार चालू असतात....या मध्ये वेगळे वेगळे प्रकार पण असतात...

समाजाने सोडून दिलेल्या ,वाया गेलेल्या मुली एका घरात कोंबायच्या आणि त्यांना मांजरी(मांजरी पेक्षा कमी कपडे असतात त्यांचे ;)) सारखे भांडायला लावायचे..मग तयार होतो "Bad Girls "
असेच मुलं मुली एकत्र टाकायच्या की झालं "Jersey Shore"..
शाळेतल्या मुलांचा अजून बिभत्स प्रकार म्हणजे "Skins"... माझ्या तरुण वयाला पण हे शो एकटे बघताना पण लाज वाटते...मी आई-बाबांबरोबर तर हे शो बघणे कल्पना पण नाही करू शकत......

हे झालं अमेरिकेमध्ये पण भारतात पण या वरुनच "बिग बॉस" निघतो...त्यात पण अशीच निर्लज्ज माकडं एका घरात भरतात.... त्यांचे माकडचाळे वाहिनीचे TRP वाढवतात...
राखीच्या स्वयंवरात लग्नाचा बाजार मांडला जातो...
"रोडीज" लावले की "पिप पिप" सोडून काही ऐकू येत नाही...या रोडीज मध्ये राग व्यक्त करायला एवढ्या शिव्या का द्याव्या लागतात मला अजून समजले नाही...त्या रोडीजचे टास्क म्हणजे तर मला विनोदच वाटतो...पेटीमध्ये परप्रांतीय मुलीला(मराठी मुलीला मी तरी कधी पहिले नाही अजून...;)) झोपवून तिच्या वरती पाण्यातले साप सोडून किवा झुरळे सोडायचे आणि तिच्या इंग्लिश किंचाळ्या लोकांना ऐकवायच्या ..असे सगळे गरीब प्रकार !.....यात तर मला त्या सापांची आणि झुरळांची दया येते...("त्यांनी मागच्या जन्मी पाप केले म्हणून या जन्मी रिआलिटी शो मध्ये काम मिळाले !")

असे अनेक कार्यक्रम रिआलिटी शो च्या नावाखाली सुशिक्षित लोकं उत्साहाने बघत असतात... यामध्ये रिआलिटी कुठे येते हे त्याचं त्यांनाच माहित...हीच गोष्ट जेम्स वेलस्ली त्याच्या "रिअल" या गाण्यातून सांगतो...आपण जे आयुष्य जगत असतो ते या रिआलिटी शो मध्ये कधीच दाखवत नाहीत....जे काही दाखवतात ते रिआलिटी च्या जवळपास पण जात नाही...म्हणूनच हे गाणं आपल्याला खूप शांतपणे आपल्याला खऱ्या रिअलिटी कडे घेऊन जाते...रिआलिटी शो च्या एका भागामध्ये ती मुलगी "तो" तिच्या प्रेमाला उत्तर देत नाही म्हणून रडते ...पुढच्या मध्ये ते दोघे एकत्र येतात ( ते कसे जवळ येतात आणि काय काय करतात हे देशा-देशावर अवलंबून आहे...;))...नंतरच्या भागामध्ये तो तिला सोडून जातो .....मग प्रेमभंगाचे नाटक आणि दुसऱ्याच्या खांदा ... शेवटी येरे माझ्या मागल्या ...

याला थोडीच रिआलिटी म्हणतात....?

५७ वर्षाचा सुखी संसार करून आपली बायको आपल्या खांद्यावर शेवटचा श्वास घेते... तेंव्हा जे प्रेम वाटते ...एकटे वाटते ...भीती वाटते ..."ते सगळे रिअल....आणि शेवटी ती देवाकडे जाताना तिचे आपल्या डोळ्यात बघणे ती रिआलिटी...!"

आपल्या आजूबाजूचे लोकं,गृहिणी असे रिआलिटी शो सारखे कपडे कधीच घालत नाही .....किंवा त्यांच्या डोक्यावर cowboy hat घालून त्याच्या अंगात धाडस येत नाही..... त्यांचे धाडस म्हणजे महिन्याच्या शेवटी कसे पण करून आहे त्या पैशात "दुध ,पेपर,लाईट ,पाणी बिल भरायचे आणि कुंटुबाला सुखी ठेवायचे ......"हीच ती रिआलिटी आणि हेच त्यांचे खरे धाडस ....."

(२६ जुलै चा )मुंबई चा मुसळधार पाऊस त्यातून survive होऊन लगेच ऑफिस ला जाणारे मुंबईकर...जपान मधला ११ मार्च चा भूकंप त्यातून एकमेकांना आधार देणारे जपानी लोकं..
"अशीच कोणतीही जीव घेणारी नैसर्गिक आपत्ती म्हणजे रिअल आणि तिच्याशी मरेपर्यंत लढणारे लोकं म्हणजे रिआलिटी...."

आर्थिक मंदीमुळे नोकरी जाणे ...पैसे नसल्यामुळे राहते घर विकायची वेळ येणे ..बायको-मुलांना रस्त्यावर यावे लागणे .. असे अनेक अवघड संसारिक प्रश्न ...आणि त्याची उत्तरे शोधणारी माणसे ...
"हेच प्रश्न म्हणजे "रिअल" आणि त्यांना भिडणारी माणसे म्हणजे रिआलिटी...!"

जेम्स आपल्या सगळ्यांना मनातून वाटतेच तेच त्याच्या गाण्यात सांगतो...
त्यामुळे अगदीच तुम्हाला रिआलिटी बघायची इच्छा झाली तर Danny Boyle चा "127 hours " बघा ....अनुभवायची असेल तर सोमवार ते शुक्रवार मध्ये सकाळी ८३५ ची CST लोकल ठाण्यावरून पकडा किंवा पुण्याच्या नाविपेठेतल्या विठ्ठल मंदिराच्या ट्राफिकमधून संध्याकाळी गाडी बाहेर काढा....पण हे पुळचट रिआलिटी शो बघणे बंद करा....!

मंगळवार, २२ मार्च, २०११

एका रस्त्यावरचे आयुष्य


नेताजी सुभाष रस्ता हे माझ्या आयुष्यातलं एक सुरेख पर्व आहे. 'जे.जे. आर्किटेक्चर'ला असताना माझी admission इथल्या सरकारी होस्टेलला झाली. ४०,००० रुपये स्क्वे.फूट च्या जागेत ६ महिन्याला फक्त ४,००० रुपये देऊन राहायला मिळत असेल हे ऐकून कोणीही वेड्यात काढेल. अन् सुभाष रस्ता सांगितलं तर ... एक मिनिट.. मरीन ड्राईव्ह, क्वीन्स नेकलेस म्हणजे आपला मराठीत नेताजी सुभाष रस्ता..!!

मित्रहो .. जळफळाट झाला का जरा..??

नेकलेस च्या साधारण मध्यभागी आमचं होस्टेल.. हो.. हे मी आणि इथे राहणाऱ्या बऱ्याच मुलींच्या आयुश्यातलं एक गोड सत्य आहे. ५ मजली जुन्या मॉडर्न स्टाईलचं बांधकाम, समोर दररोज एका नवीन ठेवणीचा निसर्गाचा wallpaper, आकाशाची निळाई, समुद्राचं खारं वारं.. किनारा म्हणता नाही येणार पण त्याप्रमाणेच थोडीफार भासणारी चौपाटी. रात्री दिवांची माळ अन् सुसाट जाणाऱ्या गाड्या... बऱ्याच लोकांनी केलेल्या या वर्णनाला अजून मी तरी किती शब्द वाढवणार म्हणा.

पहिल्या वर्षाला असताना खूप उड्या मारत आम्ही सगळ्या मुली इथे आलो. तेव्हा बराच वेळ असायचा मग बऱ्याच वेळा संध्याकाळी आम्ही walk ला जायचो. रोजचा सूर्यास्त बघायचा, समोर बसून चकाट्या पिटायच्या की दिवस संपला.

दुपारी भर उन्हात हाल व्हायचे. बस थांबा सोडला तर सावलीला फक्त नारळाची झाडं. इथेच संपलंय सगळं. त्यामुळे taxiमधून उतरताना सिग्नल हिरवा होईपर्यंत उन्हाचा अगदी ताप यायचा. सिग्नल मोडणं इथे जरा जीवाला धोकाच. तरीही दीडशहाणे लोक असतातच. भरधाव वेगानं जाणाऱ्या वाहनांच्या मधे येणं आम्हाला धजावायचं नाही. त्यामुळे ज्या दिवशी सिग्नल बंद किंवा खराब असेल तेव्हा बेक्कार कसरत व्हायची.

रविवार म्हटला की मरीन ड्राईव्हला जत्रेचं स्वरूप असतं. बड्या लोकांपासून सामान्यापर्यंत सर्वजण येथे दिसतात. फरक फक्त त्यांच्या पोशाख आणि गाड्यांमधे असतो. बड्या brand च्या कार आणि बाईक बघणं ज्यांचा छंद त्यांना तर पर्वणीच. रोज कितीही वेळ रहदारी कडे बघितलं तरी कसा वेळ जातो कळत नाही. होमसिक झालं की खिडकीबाहेर टक लावून बघत बसायची सवयच लागली. कैवल्यधाम मधे योगा करताना ताडासनाच्या वेळी क्षितिजावर मंद गतीने हलणाऱ्या cargo ships वर नजर खिळायची. आजची किती मोठी, कालची किती छोटी, एका वेळी किती पहिल्या, कोणती जोरात पुढे गेली, कोणती किती वेळ एकाच जागी आहे या चर्चा नंतर रंगायच्या. पुढे पाचव्या वर्षाला thesis topic चा प्रोजेक्ट मी जेव्हा automobile museum निवडला त्याचा पाया या रस्त्याने आधीच घालून ठेवला होतं जणू.

पावसाळा आला की समुद्राचे ते उधाण रूप बघायला मजा यायची. आकाशाप्रमाणे रंग बदलणारं पाणी, सुसाट वारा की आपणच उडून जाऊ आणि भरतीला tetrablock वर फुटणाऱ्या उंच लाटा. ही लाट जेव्हा ४.५ मीटर पेक्षा उंच येणार असं हवामान खाते सांगते तेव्हा तर तांडवच. पण तेच ओहोटीला दुरवर पसरलेला कचरा बघून वाईट वाटायचं. दिवसातून दोन वेळा ओहोटी असा संपूर्ण पावसाळा महापालिकेचे कर्मचारी रस्ता साफ ठेवायचे. थोड्या वेळाने येरे माझ्या मागल्या.  मार्ग नाही पण ते त्याला कधीच नाही म्हणत नाही.

मुंबईचा पाऊस आला तर मुसळधार, नाहीतर एक थेंब नाही. तुरळक सरी नावाचा प्रकार नाही. त्यात भरतीची वेळ असेल तर सोसाट्याचा वारा.. छत्री शक्यतो न उघडलेलीच बरी. संपूर्ण काडीची तरी ठीक पण फोल्डिंग ची असेल तर garantee फक्त ५ मिनिटाचीच आणि तुम्ही चिंब भिजणार हे नक्की. तरीही हौसेने भिजायला येणाऱ्यांची संख्या पण काही कमी नाही. पावसाचा आवाज आल्या आल्या होस्टेलच्या खिडक्या बंद करणे म्हणजे roadies पेक्षा अवघड टास्क. जुन्या लाकडी खिडक्या वाऱ्यामुळे आत ओढताना हालत खराब व्हायची. तोपर्यंत पाणी आत आलेले असणार. वर कष्टाने बंद करण्यात सफल झालो तरीही waterproofing वरचा भरवसा कधीच उठला होता. (सरकारी काम शेवटी) कॉलेज मधून आल्यावर ओले कपडे वाळवणे, पाण्यापासून laptop आणि submissions वाचवणे यासाठी इस्त्री आणि पंखाच मदतीला धावायचा. उन्हाळ्यात पण एवढं विजबील येत नसेल तेवढं पावसाळ्यात येत असेल आमच्या होस्टेलचं.. :) पण याचा वैताग कधीच नाही आला.

एरवी mobile वर पर्सनल गप्पा असतील तर आमची बाल्कनी आम्हाला फार प्रिय. रात्री- अपरात्री बऱ्याच वेळा आम्ही बाल्कनीत उभे राहायचो. थोडा ट्राफिक चा जोर कमी असायचा. या वेळी शांतपणे लाटांचा आवाज ऐकत आमच्या बाकड्यावर आम्ही सांडायचो. submissions च्या वेळी मधेच विरंगुळा म्हणून आपापल्या रूम सोडून आम्ही शांतपणे बाल्कनीत गप्पा मारायचो. रात्री टवाळक्या करणारी पोरं मोठ्याने बळच "पूजा" नावाने ओरडायची. उगाच.. अंगात मस्ती...

गणपतीची मिरवणूक बघायला आमची टेरेसवर वर गर्दी व्हायची. दुरवर अडकलेलं ट्राफिक, वाजतगाजत नेणारे गणपती, हेलिकॉप्टरमुळे समुद्राच्या पाण्यावर आलेली वलय आणि एका वेगळ्याच जोशाने सजलेले मुंबईकर, vintage car rally याची देही याची डोळा अन् ते पण घर बसल्या, मंत्र्यांच्या भरधाव जाणाऱ्या गाड्यांचा ताफा अन् शुटींग च्या भोवती माणसांचा घोळका असे कितीतरी क्षण.
 
वर्षातला एकाच दिवस असतो जेव्हा इथे "pindrop silence" असतो. तो दिवस म्हणजे marathon चा दिवस. या दिवशी ट्राफिक दुसऱ्या दिशेला वळवले असते. जिमखाना मैदानावर बऱ्याच वेळा मोठ्या घरातले लग्न समारंभ होतात. त्यांची नयनरम्य आतिषबाजी अगदी फुकट बघायला मिळते. वानखेडे, ब्रेबॉर्नला कधी क्रिकेटचा सामना असेल तर मग विचारायलाच नको. लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत (आणि त्यांची कुत्री सुद्धा) येथे वेळ दवडायला पुढे मागे पाहत नाहीत.

मधेच एखादा करकचून ब्रेक दाबायचा आवाज आला की काळजाचा ठोका चुकायचा. उघड्या डोळ्याने पाहिलेले ओबेरॉय चे स्फोट व चौपाटीवरच्या encounter नंतर दारूगोळ्याच्या वासाने आजही अंगावर शिरशिरी येते. एरवी दिमाखाने उभे असणारे ओबेरॉय होटेल त्या रात्री काळोखात गुडूप झाले होते. ४ दिवस होस्टेल ला दबकूनच होते सगळे. सर्व न्यूज, वर्तमानपत्र वाचून, मोबाईल वर शेकडो काळ्जीस्वरांना उत्तरं देता देता धीर संपत होता. दुसऱ्या दिवशी चील मधे जॉगिंग करताना मुंबईकरांनी एक वेगळाच धडा आम्हाला शिकवला.

उत्सव, rally, सर्व ऋतू, accidents अशा कितीतरी गोष्टी सामावून घेऊन या मरीन ड्राईव्हने तिथला ऐकन् एक क्षण एखाद्या स्वप्नाप्रमाणे फुलवलाय अन् बरेच काही शिकवलेय.. कदाचित आत्ताचे काही क्षण माझ्या कॅमेरातून आणि पोस्ट वाचून तुम्हाला सुद्धा ते अनुभवता आले असतील...!!

बुधवार, १६ मार्च, २०११

कितीतरी गोष्टी .... उन्हाळ्याच्या...!!

पुण्याचा उन्हाळा म्हणजे रखरखीत ऊन अन् दुपारी गरम झळा  पण संध्याकाळ होताच मंद थंड वारा..!!

कोकिळेची तान.. टेरेस मधे खारीचा नाच.. पोपटांचे थवे.. हल्ली कधीतरीच चिमण्यांचा चिवचिवाट.. मालकाबरोबर "walk"ला निघालेली कुत्र्याची पिल्लं.. मधेच गुल होणारी मांजरं.. पाचगाव पर्वती वरचे रोज दिसणारे मोर..  .. .. कितीतरी गोष्टी ..!!

झाडावरच्या कैऱ्या.. करंडीतले आंबे.. शाळेबाहेर आजींकडच्या चिंचा.. समोरच्या गाड्यावरचा बर्फाचा गोळा.. रेशनवाल्या काकांकडे चोरून खाल्लेला पेप्सीकोला.. लाल कापडावरची कलिंगड फ्रूट डिश.. कावरे, सुजाता, गणू शिंदे.. दुपारी घंटी वाजवत येणारा कुल्फीवाला.. लस्सी, ताक, मठ्ठा, ज्यूस, थंडाई, मिल्कशेक, सरबत.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

१०वी १२वी च्या परीक्षा.. engineering च्या सुट्ट्या.. ऑफिस मधली प्रोमोशन्स.. २८ फेब्रुवारीचं बजेट.. आयुकाची फ्री ट्रीप.. industrial new year.. मराठी गुढीपाडवा.. होळीचा चटका.. रंगपंचमीचा ओलावा.. एप्रिल चे fools.. मे चा अभिमानी कामगार.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

 डोक्यावर स्कार्फ, नखशिखांत त्वचा सूर्यापासून वाचवणाऱ्या मुली.. सनकोट gloves ची खरेदी करणाऱ्या असंख्य बायका.. हेल्मेट , गॉगल चढवून फिरणारी मुलं... AC चालू ठेवून थंडपणे कार चालवणारी माणसं.. छत्री सावरत डुलत डुलत जाणारे आजीआजोबा.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

सुट्ट्यांचं कधीही न संपणारं planning.. कधीतरीच confirm होणारं रेल्वेचं तिकीट.. शेवटी आपलीच गाडी काढून केलेल्या कोकणसहली.. महाबळेश्वर माथेरान च्या strawberries.. water kingdom च्या फेरी.. समुद्रात डुंबायची लहान्यांची मजा... मोठ्यांच्या सूर्यास्ताच्या आठवणी.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

morning walk नंतर वाडेश्वर ला जमलेली गर्दी.. कॅडबी बाहेर जमलेली कितीतरी टोळकी.. जास्तीत जास्त softy खाण्याचा पैजा.. रात्री पाण्याच्या टाकी शेजारी मित्रांच्या न संपणाऱ्या गप्पा.. मग  तो वळवाचा पाऊस.. गाड्या काढून भिजत दुरवर भटकणारी तरुणाई.. घरीच गरम गरम भजींवर ताव मारणारी मागची पिढी.. चिंब भिजून खायची नुकतीच तळलेली जिलेबी.. शेवटी पोट भरून उरणारी चेतन्य च्या पराठ्याची कहाणी..  .. .. कितीतरी गोष्टी ..!!

धरणीला भेगा.. पाण्याच्या रांगा.. विजेचा लपंडाव.. कागदाचे पंखे.. नेमके त्याच वेळी world cup चे सामने..  सरकारला शिव्या   .. .. कितीतरी गोष्टी ..!!

पण शेवटी शांत होणाऱ्या मातीचा सुगंध..... अश्याच .. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

बुधवार, ९ मार्च, २०११

ICEDTEA, मी आणि ऑफिसच्या गप्पा..

माझ्या सारखंच होस्टेलला बँगलोरला असणारा माझा मित्र घरी सुट्टीसाठी परत आला होता तेव्हा मी त्याला भेटायला गेले होते. दुर्गा शेजारी zest ला भेटायचं ठरलं. iced tea आणि माझी ही पहिलीच भेट. दोन ग्लास फुल आणि चार तास गप्पामधून ठरलं mood indigo ला जायचं. माझं सगळं बुकिंग त्याने केलं. तिसऱ्या दिवशी दादरला भेटायचं ठरलं.

जवळ जवळ २०-२५ लोक तरी असतील आणि त्यातल्या फक्त एकाला ओळखणारी मी असे सगळे पवईच्या बस मध्ये बसलो. हे सगळे माझ्याहून ३-४ वर्ष तरी मोठे. त्यामुळे पहिला एक दिवस तर "मी का आलेय इथे" हाच विचार करण्यात गेला. त्यातल्या ७-८- जणांशी पुढच्या ३ दिवसात माझा चांगलं जमलं. चार दिवस मजा करून आपापल्या घरी आम्ही रवाना झालो.

मार्च मध्ये परीक्षा संपल्यावर मी सुट्टीसाठी घरी गेले. एक दिवस अचानक एक sms आला. "zest at 7pm" मनात एवढं नसून देखील मी जायला तयार झाले. काही दिवसांनी जास्त विचार करायला नाही लागला. कधी एकदा भेटतोय असा व्हायचं. सगळे ऑफिस वरून थकून भागून यायचे पण शक्यतो कोणीच कंटाळा करायचं नाही. सुट्टीच्या दिवशी दुपारी, किंव्या ऑफिस सुटल्यावर ८ वाजताचा जरी sms आला तरी प्रत्येक जण हजर. mood indigo म्हणजे coffeeshack ची icetea आणि गुलमोहरचं चिकन हे ठरलेलं गणित. संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी मोठ्ठ्या रांगेत उभं राहताना iced tea चे कित्येक घोट पोटात टाकलेत मोजलं नाही.

पुण्यातला zest हा आमचा आवडता अड्डा. cadB पेक्षा जास्त प्रिय.समोरचं टेबल असो की आतली वरची खुर्ची असो, उभे राहून दुकानाच्या शटर पुढे आमच्या गप्पा चालूच असायचा. आज ऑफिस ला कसा उशीर झाला, बॉसने काय सुनावलं, कॉम्पुटर कसा hang झाला , मी किती झोपेत होतो, टिफिन मध्ये काय भाजी होती, बरोबर निघतानाच कसं बॉसने काम दिलं, आणि आमची किती चीडचीड झाली.. अश्या कधीही न संपणाऱ्या गप्पा चालायच्या.. हळू हळू त्यात GRE, admission, fees, recomandation letter ची भर पडायला लागली.. ते माझं अजून जगच नसल्याने मला सारखं तेच तेच ऐकून वैताग यायचा.(आता पूर्णपणे समजू शकते पण तरीही मी माझ्या ऑफिस मध्ये खूप सुखी आहे)  मी एकटीच कॉलेज मधली असल्याने ऐकण्या खेरीज माझ्याकडे पर्याय नसायचा. माझ्या विषयावर बोलायची वर्ष त्यांच्या आयुष्यात कधीच सरली होती.  पण एक वेळ यायची तेव्हा मलाही "बास करा आता" ओरडायला व्हायचं.

पण एवढं असूनही कसं काय ही टोळकी माझी कधी सुटली नाही, मी आणि आमच्यातलीच एक मैत्रीण कित्येक दुपारी zest ला जायचो. गप्पा gossip कधीच थांबत नाही त्याला आम्ही पण अपवाद नाही. सगळे एकत्र असलो तर धिंगाणा.. "iced tea peach" किती ग्लास रिकामे केलेत याची गणती नाही. कित्येक आठवणी फोटो आणि VIDEO मध्ये साठवून ठेवल्या आहेत.. दुपारची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र कशी व्हायची कळायचं जेव्हा हळू हळू घरच्यांचे mobile वर ठणाणा फोन वाजायचे. गाडीच्या accelerator ला पिळ देऊन आपापल्या घरांकडे सुसाट गाड्या सोडायचो अन् घरी नीट पोचल्याचा missed call..

आज आम्ही तिघे-चौघे सोडलो तर बाकी सगळे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आहेत. पण skype वर गप्पा मारताना बाजूला iced tea च्या ग्लास ची बेक्कार आठवण येते. एकाचा मित्र, त्याचा भाऊ, त्याची मैत्रीण, तिचा सिनिअर, माझा त्यांचा संबंधही नसताना, वयाने लहान असताना सुद्धा आमची मैत्री कशी झाली आणि ती कशी टिकली याची आठवण त्यातल्याच एकाने आज करून दिली. डोळ्यात २ वर्षांचा चित्रफितीचा रीळ अख्खा उलटा फिरला.. सगळ्यांना परत एकत्र भेटून कडकडून मिठी मारायचा मानस आहे पण अमेरिकेतून एकाच वेळी सगळ्यांनी घरी यायच्या त्या चमत्काराची वाट बघत आहे... !!

सोमवार, ७ मार्च, २०११

बेकरण है बेकरण.... आंखे बंद किजिये ना..!!

बेकरण है बेकरण.... आंखे बंद किजिये ना..!!
७ खून माफ जरी पहिला नसेल तरी गाण्याच्या अगदी दुसर्‍या ओळीला डोळे बंद करायला लावणारा विशाल भारद्वाज चा आवाज आणि "गुलजार साब" चे शब्द..
गाणे पुढे सरकत जाते तसे तसे काळजात खोल रुतत जाते..

"बेकरान" हा एक वेगळाच शब्द या गाण्यात ऐकायला मिळाला पण त्याचा अर्थ फक्त बेकरार(restless) नसून "किनारा नसलेला" unlimited restless असा आहे.
एका मुलीच्या प्रेमाच्या एकरूपातेची खोली इथे कळते. "गुलजार साब"च्या अभ्यासाची प्रती इथे येते.. त्यांच्या कडून नेहमीच असे unexplored शब्द ऐकायला मिळतात.
''डूबने लगे है हम, साँस लेने दीजिए ना..!!"
दोन लग्न आणि दोन खून केल्यावर उत्कट प्रेमासाठी आसुसलेली व्यक्तिरेखा प्रियांका ने सुरेख कोरली आहे..
"जाने क्या सोच के इस बार मेरी आख झुकी है.. आप को देख के बड़ी देर से मेरी सांस रुकी है...!!" एका नवीन आशेने ती सज्ज उभी आहे..आज एक महिना जवळ जवळ मी दुसरे एक पण गाणे winamp मधे एवढे मन लावून ऐकले नाही.
दिवस रात्री कधीही ऐकलं तरीही गाण्यात
पूर्ण हरवायला होतं .. आणि सिनेमा पहिल्यामुळे नकळत काश्मीर मधे गेल्यासारखा वाटतं.
त्याला इतर कारणही असतील पण या गाण्याने जेवढा वेड लावलं तेवढं फक्त हरिहरन च्या आवाजानेच लावलं असेल....
संगितातला एवढा खोल अभ्यास नाही किंवा जास्त माहिती पण नसेल, अजुन याहून सुरेख गाणी आहेत आणि येतील,
पण हे गाणे माझ्या playlist मधून कधी delete होणार नाही हे नक्की...!!

तो एक सैनिक आहे ...!

कुठले पण बातमीपत्र उघडले की महत्वाच्या बातम्या या जगभरातल्या युद्धांच्या असतात.....अमेरिका कशी इराक ,अफगाणिस्तानमध्ये घुसते आहे ?,ओबामा चे मत काय ? लिबिया मध्ये कसे युद्ध पेटले आहे ? ब्रिटीश राज्यकर्ते कसे युद्धाचे डावपेच खेळतात आहे..? या बातम्यांमध्ये फक्त राष्ट्र आणि राजकारणी बदलत असतात युद्ध तर चालूच असते..पण या युद्धाचे प्रमुख घटक सैनिक यांचा कुठेच उल्लेख नसतो...त्यांचे नाव कधी Fortune 2011 च्या यादीत नसते किवा सिलेब्रिटी लिस्ट मध्ये नसते...

जो पर्यंत युद्ध आपल्या घरापर्यंत पोहचत नाही तो पर्यंत "अपनेको क्या ?" या attitude मध्ये आपले सगळे आयुष्य निघून जाते ."पैसे,घर ,गाड्या ,बायको-मुलं यातच आपण मग्न होऊन जातो..या सैनिकाची आठवण विरून जाते...

अश्याच एका सैनिकाची आठवण मी तुम्हाला आज करून देणार आहे .....हे गाणं एका "अमेरिकन" सैनिकावर लिहिले आहे...यातला अमेरिकन हा शब्द गौण आहे कारण सैनिकाला देश,धर्म,जातपात काही नसते....युधिष्ठिराने म्हणले आहे की "सैनिक हाच एक एक धर्म असतो..." .हेच सोप्या शब्दात Toby Keith (टोबी केथ ) सांगतो......आपण लोक ज्याचा कधी जास्त विचार करत नाही त्या वरतीच टोबीने हे गाणे लिहिले आहे.....त्याला पण त्याचे कुटुंब आहे... त्याचे त्याच्या मुलांवर आणि बायको मुलांवर जीवापाड प्रेम आहे ...त्याला पण घरची जवाबदारी आहे...पण जेंव्हा duty वर जायचे पत्र येते तेंव्हा तो काहीच करू शकत नाही कारण "तो एक सैनिक आहे..."

तो सगळ्यांसाठी आहे पण त्याच्या साठी कोणी नाही...तो पैश्यासाठी काम करत नाही...किंवा त्याला प्रसिद्धी पण नको आहे...तो फक्त देशासाठी लढणे माहित आहे कारण "तो एक सैनिक आहे..."

तुमच्या आमच्या सारखे खोटी खोटी कारणे दाखवून तो सुट्ट्या घेत नाही किंवा "चला दिवाळी आली" म्हणून घरी पण येत नाही....तो फक्त देशासाठी आणि देशवासीयांसाठी अहोरात्र जागा आहे...कारण "तो एक सैनिक आहे..."

देशाचे स्वातंत्र्य जेंव्हा धोक्यात येते तेंव्हा तो त्याचा जीव पणाला लावतो.तो धर्म,जात ,पंत याच्या व्याख्येत बसत नाही...त्याला स्वातंत्र्य कधीच मोफत मिळत नाही (आपल्याला मिळणाऱ्या मोफत स्वातंत्र्यासाठी) त्याला त्याच्या जीवाची किंमत मोजावी लागते...
तो स्वतःहून कधीच मरण मागत नाही पण मृत्यू समोर आला तर मरणाला घाबरत नाही.....कारण "तो एक सैनिक आहे..."

हे गाणं ऐका आणि या सैनिकाला कधीच विसरू नका कारण एक लक्षात ठेवा..."तो एक सैनिक आहे" म्हणून आपण सुरक्षित आहोत "!

रविवार, ६ मार्च, २०११

आर्किटेक्ट

एक अष्टपैलू व्यक्तिमत्व...!!

मी स्वत: एक आर्किटेक्ट आहे त्यामुळे वाटू शकतं की उगाच हवा करतेय पण गेले ५ वर्ष जे काही बघितलंय त्याबद्दल थोडंसं लिहितेय॥ कोणत्याही आर्किटेक्टला जवळून पहिलात तर माझे म्हणणे नक्की पटेल..

या प्रोफेशन मधे यायचं म्हणजे ओघानेच तुमचं रंगकाम आणि स्केचिंग चांगलं असतंच.. त्यामुळे कॉलेजच्या पहिल्या दिवशी कोणी तुमचे छंद काय हे विचारलं आणि रंगकाम, स्केचिंग हे उत्तर दिलं तर रॅगिंग होणार हे नक्की... नुसत्या हातावर कितीही कौशल्य असले तरी भागात नाही. कंप्यूटर वर पण command पाहिजे हो.. एखादं presentation करायला सॉफ्टवेर इंजिनियर पण वापरात नसेल एवढे applications वापरतो आम्ही.. सुरवात होते autocad पासून, नंतर revit, google sketchup and earth, आणि 3D MAX मधे खरेखुरे दिसणारे views... त्यांची सजावट करण्यासाठी adobe photoshop असतंच..

हे सगळे client समोर नेण्यासाठी microsoft office चा पुरेपूर फायदा घेतला जातो.. अगदीच अफलातून बनवायचं असेल तर movie maker चा आसरा घेतला जातो, मग ओघानेच recording, cutting प्रकार येतात..
हे एवढं नीट वापरायला तसाच latest configuration चा लॅपटॉप घ्यायचा म्हणजे सगळ्या कंप्यूटर कंपनीचा खोलवर "research" होतो। या वेळी लॅमिंग्टन रोड वर च्या कोणत्याही दुकानदारा एवढी माहिती तर नक्कीच आम्हाला असते॥ तरीही हा लॅपटॉप कधी तरी थकतो आणि मग सुरू होतो tension आणि चिडचिड चा खेळ.. पण यातही corrupt file कशी recover करायची, जगातला कितीही भयानक virus आला तरी कसा काढायचा हे कोणी शिकवावं लागत नाही.. hardware पासून सगळ्याचा maintenance महिन्यातून एकदा तरी होतोच.. आता प्रत्येक वेळी कोण इंजिनियर ला पैसे चारणार मग ओघाने ते पण माहीत असतंच. formatting , printing पर्यंतचे सगळे प्रकार आणि अडचणींना सामोरे जाउन आमचं जगणं शांतपणे चालू असतं.. !!

ते सगळं हाताने केलेलं काम, सगळी स्टेशनरी जपून ठेवणं म्हणजे अजुन एक मोठ्ठ कटकटीचं काम असतं. पेपर आणि आमचं अतूट नातं आहे. त्यावर कितीही चींखडा, रेघोटया मारा वा रिसर्च बुक लिहा, की त्यालाच कापून त्याचे मॉडेल बनवा, अगदी ट्रेसिंग पासून पुटठयापर्यंत, newspaper पासून थर्मोकोल पर्यंत .. प्लास्टिक शीट पासून flexboard पर्यंत सगळ्यांची पिढी कोण कुठली हे लग्न जमवणाऱ्या माणसाप्रमाणेच पाठ असते. मॉडेल बनवायचे म्हणजे नीटनेटकेपणा आलाच.. ओघानेच नंतर आम्ही ऑरिगामी मास्टर होतो. चुकुन कुठे कापलच तर first aid पुरता डॉक्टर अंगात असतो.

आमच्या आया-आज्या जाम खुश असतात. घर साफ ठेवायला ओरडून सांगायला लागत नाही. मॉडेल स्वच्छ ठेवायचे, पेपेर पिवळे पडू द्यायचे नसेल तर ही कसरत (जास्त नाही पण थोडीशी) करायला लागते॥ hair dryer मॉडेल साफ करताना बेक्कार वापरला जातो.. फुंकर घालून घालून जीव जाण्यापेक्षा हा मस्त उपाय शोधून काढलाय मी..

रात्र आयुष्यातून shift delete करून टाकली असते किंवा दिवस २४ तासाचा पकडला जातो. रात्री भुका लागल्या की काय खायचं काय नाही हे सगळ्या ज्ञान आईने द्यायची गरज कधी पडत नाही. भटकंती प्रचंड होत असल्याने ट्रेक, tour काही नवीन वाटत नाही. ओघानेच कॅमेरा चांगला मिळतोच त्यामुळे average लोक photography मध्ये पटाईत होतात.

सर्व मोठ्या मंडळींचे सल्ले ऐकून, प्रोफेसर ने डोके पिळवटून सवय झालेली असते, जगातला कोणताही torture पेलण्याची. आम्हाला humanity नावाचा पहिले ३ वर्ष एक विषय असतो.. त्यात शिकवत नाहीत पण खूप लोकांशी बोलला जातं, त्यातूनच आमची समाजाशी जवळीक निर्माण होते. असा म्हणतात public ला सगळ्यात जास्त आपला वाटणारा माणूस म्हणजे डॉक्टर, पण तेवढाच संवेदनशील architect पण असतो. रस्त्यावरच्या आयुष्यापासून 7star luxury spaces बांधायच्या आणि त्यात कोणताही तुच्छापणा किंवा गर्व नसतो. public relation department असा प्रकारच मुळी आमच्या office मध्ये नसतो. टाटा, ऐश्वर्या ह्यांना कदाचित architecture चा हा असा फायदा झाला असावा. (फार कमी लोकांना माहिती आहे पण हे दोघेही architect आहेत) teamwork पाया असलेला profession असल्याने सगळ्यांशी खेळीमेळीने वागण्याची सवयच लागते.
एवढं असूनही client समोर हात टेकायला लागतात॥ आत्ता पर्यंत वाढवलेला patience पार पणाला लागतो। त्याला पटवणे मुलगी/मुलापेक्षा जोखमीचे काम. design कितीही अफलातून झाले तरी client आणि "money matters " मध्ये पार ढवळून निघते आणि पण शेवटी जमिनीवर उभे राहते. आपल्या कितीही मनाप्रमाणे झाला नाही तरी ते किती best आहे हे खरेखोटे बोलण्याचं licence वरूनच मिळालेला असतं. तेव्हा पण समोरच्याचं मन वळवण्यात यशस्वी झाल्याचा समाधान एखाद्या psychologist लाच समजेल.

डोळ्यावर भिंग लावून, पाठीचा चुराडा करून, दिवस रात्र एकत्र करून केलेलं ते project बघून जे काही वाटतं ते दुसरा architect च समजू शकतो. तरीही डोक्यात हवा न जाऊ देता आपले सर्व कौशल्य मुठीत ठेवून सुधा छुपा रुस्तम बनून वावरणारा architect शेवटी एक "common man " च असतो....!!

आवरा आवरी..!!

आज खऱ्या अर्थाने आमच्या घरातला हिवाळा संपला. आवरा-आवरी करण्यात सकाळी आई मग्न होती. अर्धवट डोळे उघडून मी सहज विचारलं आज कोणी घरी येणार आहे का? त्याला उत्तर "नाही, हिवाळा संपला आता. उन्हाळा सुरु झालाय" असा मिळाला. आता आवरण्याचा आणि हिवाळा संपायचा काय कौतुक..मी तसेच डोळे बंद केले आणि अजून एक तास झोप काढली पण दिवस भर तसंच पडून राहणं शक्य नव्हतं.

घर आवरणे हा आमच्या आईचा छंद आणि maintencace हा नावडता शब्द आहे. नीटनेटकेपणा हा आमच्याकडे जरा ४ किलो जास्तच असतो. कधी कधी त्याचा अशक्य वैताग येतो. आज रविवार असल्याने आईचा मला पण कामाला लावायचा मानस होता. निमित्त होतं उन्हाळा सुरु झाल्याचा. जेवण झाल्यावर शांतपणे माझ्या खोली पासून सुरवात झाली. खरंतर माझ्या खोलीत आवरायला काय बाकी हा मला प्रश्न पडला होता. फक्त ३-४ गोष्टींच्या जागा बदलल्या होत्या पण त्या पूर्वीच्या जागांपेक्षा जास्त दूर नव्हत्या. पण तरीही एक भाषण मला ऐकवण्यात आलं. (करायला लागतं नाहीतर बोलण्या खायला लागतात) ह्या आवरण्याचे पण आईचे असंख्य प्रकार आहेत. रोजचे तेच तेच, पण तिला कधीही कंटाळा न येणारे. त्यांची यादी केली तर जास्त काही नवीन नाहीत त्यामुळे त्याबद्दल बोलत नाही.

maintenance हे जणु बोर्डाची परीक्षा असावी. घरात कोणताही काम निघालं, एखादी गोष्ट घायची म्हटली तरी आईच्या या परीक्षेतून त्यांना पार व्हावा लागतं. उदा:
  • शक्यतो ना फुटणारी वस्तू असावी म्हणजे साफ करताना काळजी घायला नको.
  • गुळगुळीत नसावी म्हणजे सटकायची भीती नको.
  • रंग जरा मळखाऊ असावा म्हणजे थोडी जरी मळली तर पटकन कळत नाही.
  • आणि पांढरी शुभ्र (शक्यतो कापड प्रकार) असेल तर washing machine मध्ये एकदा टाकली की direct स्वच्छ बाहेर..
अजून खूप आहेत पण हे तुमच्या आमच्या घरातले (कधी कधी डोक्याला ताप देणारे पण तेवढेच बरोबर असणारे) काही नियम.
होस्टेल ला असताना आम्ही बरीच (जास्त नाही, पण थोडी) काळजी करायचो या गोष्टींची. पण तेव्हा त्या डोक्याला भार वाटल्या नाहीत. सगळ्या गोष्टी त्यांच्या जागेवर नीट ठेवाव्यात या वाक्याचा तर आता वीट आलाय. ह्यातूनच एकदा गोड उलट बोलून एका dialogueचा जन्म झाला. आम्ही पण वस्तू आवरून ठेवतो, पण आई, तुमच्या आमच्या त्या जागा वेगळ्या असतात..!!! याला बऱ्याच लोकांनी दाद दिल्यामुळे मी उलट बोलल्याचं वाईट वाटलं नाही.

सध्या घरीच असल्याने आई आहेच ना म्हणून सोडून देते.. कपड्यांची बोचकी, वस्तूंचा पसारा, charger headphones ची गुंतागुंत हे परत घरात दिसायला लागलेत. कितीही आवरले तरी मला कधीच न सापडणाऱ्या गोष्टी सध्या लगेच मिळतात. सगळ्या डोळ्यासमोरच असतात.. पण त्या कधी खुपत नाहीत किंवा काय उगाच पडलंय असंही वाटत नाही मग त्या पसारा categary मध्ये कशा मोडतात हे मला अजून कळलं नाही अणि असलाच थोडा पसारा तर काय फरक पडतो. शेवटी आपलं आपणच शोधतो की. मला काय हा सगळ्यांचाच (आपल्या पिढीचा) प्रश्न आहे शेवटी॥

नुसता घर आवरण्यावर पण कधी एवढं लिहेन वाटलं नव्हतं.. पण आता हे पोस्ट पण आवरायला हवं नाहीतर उगाच इथे शब्दांचा पसारा होईल... (वावा .. dialogue.)

शुक्रवार, ४ मार्च, २०११

इडली चौधरी..!!


इडली चौधरी..!!
हो.. बरेच लोक मला या नावाने ओळखतात...

आज पहिलाच पोस्ट इडली वर कसा काय आला याचा विचार करत असाल.. आत्ताच ऑफिसमधून आलेय आणि laptop उघडून बसलेय, आज घरी इडली चा बेत आहे आणि आई स्वयंपाकघरात मग्न आहे.. मी नेहमीप्रमाणे फक्त खाण्याचा काम करणारे...

लहानपणी गरवारे बालभवन ला खेळायला जायचे मी रोज संध्याकाळी. टाटा मोटर्स मध्ये असल्या मुले बाबांना गुरुवारी सुट्टी असायची. खेळून झालं की मी, आई, बाबा सारसबागेत जायचो. मध्ये ३-४ फुगे फोडून झाले आणि सिंहावर मनमुराद सवारी करून झाली मी समोर इडली वाले काका आणि नारळाचा पाणी ठरलेलं
असायचं. रविवारी कॅम्प फिरायचं नेहमीचंच. मार्झोरीअन आणि समोर मिळणारी इडली , शेवटी ice-cream हा ठरलेला बेत असायचा..

शाळेत जाताना सकाळी सकाळी इडली खाऊन जायचे बऱ्याच वेळी.. दुपारची शाळा झाली आणि ही प्रथा बंद पडली.. सकाळी क्लासेस आणि दुपारी शाळा यात नाश्ताचे concepts जरा बदलले.. आमच्या शाळेच्या कॅन्टीन मध्ये १ रुपयाला एक इडली मिळायची. दुपारच्या वेळी २ ब्रेक असायचे, पहिल्या वेळी डबा निम्मा संपवून टाकला जायचा आणि दुसऱ्या ब्रेक मध्ये एक दिवसा आड इडली खाल्ली जायची.. पोट भरला असेल तरीही.. १०वी च्या सुट्टीतत एका मैत्रिणी बरोबर तिरुपती ला जायचा योग आला, त्यांची एकत्र कुटुंब पद्धत.. असे
त्यांचे २५-३० जण आणि आम्ही तिघे निघालो.. ते सगळे कन्नड असल्यामुळे अस्सल south indian खायला मिळाले. १५ दिवस राहून आईला वाटला होता की माझा इडली वेड कमी होईल पण उलटंच झालं.

कॉलेज मध्ये असताना आम्ही किती तरी वेळा वाडेश्वर (बाजीराव रोड), S.S. चं कॅन्टीन मध्ये पडीक असायचो. “वैशाली”ला तर विसरून चालणारच नाही.. ऐन रविवारी आणि ते पण सकाळी वैशाली चा रस्ता धरताना आमच्या group मध्ये कोणीही कधीही विचार केला नाही किती वेळाने table मिळेल.. पुणे सोडताना एकदा शाळेत जाऊन सगळ्याना भेटून आले, तेव्हा न विसरता कॅन्टीनच्या काकूंना पण भेटले, या
वेळी खिशातून एक रुपया काढायची गरज पडली नाही.

मुंबईला असताना होस्टेल ला रविवारी सकाळी नाश्त्याला इडली-सांबार असायचा. सुटीच्या दिवशी कधीही १२ शिवाय न उठणारे आम्ही अलार्म लावून ९.३० ला उठून धावतपळत मेस गाठायचो. (१० ला मेस बंद व्हायची) तिकडे असताना आपल्या वाडेश्वर ची बेक्कार आठवण यायची. एकदा एका मित्राने माटुंग्याचं उडिपी
हाऊस चा पत्ता सांगितला. माझ्या वाढदिवसाला स्पेशल मेनू ठरला. V. T. STATION जवळची खाऊगल्ली, कॉलेज समोरचे प्रत्येक रेस्टॉरंट, गिरगाव मधले उपहार गृह, सकाळी सकाळी पेपरवाल्यांना नाश्ता पुरवणाऱ्यापर्यंत सगळ्यांकडे हे शौक पूर्ण करून झाले. वाशी ला स्टेशन बाहेर एका कॅफे मध्ये वाफाळती इडली मिळते, माझ्या पटेल(खाण्यासाठी जन्म घेतलेल्या) मित्राने मला सांगितले. त्या नंतर वाशी सोडताना कधीही त्या कॅफेला गेलो नाही असे झाले नाही.

शेवटच्या वर्षाला असताना thesis च्या वेळी मी दोन महिने चेम्बुर ला शिफ्ट झाले होते, तिथे स्टेशन जवळ एक उडिपी हाऊस होतं. रात्रभर काम करून सकाळी उठल्यावर गरम गरम इडली रस्सम खायला आम्ही जायचो. Final date जवळ यायला लागली तसा आम्ही बंद केला पण बाबा जाऊन घरी बांधून घेऊन यायचे.. चेम्बुर
सोडताना फक्त इडली साठी गाडी थांबवली आणि मगच पुण्याचा रस्ता धरला. सध्या ऑफिस मध्ये एक तेलगू बाई आहेत त्यांच्या कडून अजून वेगळे प्रकार खायला मिळतात.. आणि दोन मिनिटावर STEAMY AFFAIR आहेच. कुट्टी इडली, शेवया इडली, शेजवान, कान्जीपुराम, कोर्न असे ४०-५० वेगवेगळे प्रकार तिथे खायला
मिळतात. (माझे अजून सगळे खाऊन नाही झाले पण जास्त वेळ लागणार नाही)

कुठेही गेला तरी सहजतेने कोणत्याही खाण्याच्या ठिकाणी, मग ते मोठे होटेल असो किंवा एखादी टपरी असो, बनवायला सहज सोपा हा पदार्थ मिळतोच, शक्यतो त्याची कृती चुकलेली नसतेच.. घरी खा किंवा बाहेर खाऊगल्लीत खा, वैशाली मध्ये किंवा दिवेआगरला रात्री भरतीच्या वेळी,केळीच्या पानावरची वाफाळती
इडली आणि खोबऱ्याची चटणी नेहमीच मला वेड लावते. ह्या एवढ्या वेडावरच मला इडली चौधरी नाव पडलंय.. खरंच वेड आहे ते, वाढता वाढता वाढे, इडलीप्रेम माझ्या मना..!!

बुधवार, २ मार्च, २०११

माझे फेसबुक स्टेटस मेसेज चे प्रयोग २ ...!खूप दिवस वेळच मिळाला नाही thermodynamics ची परीक्षा असल्याने झोपेत मला ग्रीक सिम्बॉलच दिसत होते....आज मात्र दिवसभर लिहिण्यासाठी हात शिवशिवत होते..शेवटी मुहूर्त लागला आणि फेसबुक ची गोष्ट डोक्यात सुरु झाली......फेसबुकने मला वेड लावले आहे असे म्हणता येणार नाही "मी आधीच अनेक गोष्टीसाठी वेडा होतो" ते फक्त जगासमोर खुलं करायची संधी मला दिली आहे....मागच्या भागात काही मराठी स्टेटस मेसेज लिहिले होते या भागात काही इंग्लिश स्टेटस मेसेज पण टाकणार आहे...

मी केमिकल मध्ये मास्टर करत असल्याने "संशोधन"(??) करण्याचे पैसे मिळतात ...त्यासाठी जो माझा बॉस किवा शिक्षक असतो त्याला एकडे "adviser" म्हणतात ..."५ दिवसाचे पैसे देऊन १० दिवसाचे काम" कसे करून घायचे याची कला याला साध्य असते....म्हणून ५ दिवस काम करून २ दिवस काम न करण्याचा प्रयत्न मी करत असतो (पण ते अजून शक्य झाले नाही !) म्हणून माझ्या आयुष्याची व्याख्या सोपी आहे..."My life is simple...5 day Adviser 2 day Budweiser"(बडव्ह्ययझर हे एक सोनेरी रंगाचे पेय आहे...;))


विद्यार्थी असल्याने दिवस लवकर लवकर पळत असतात ...एक सेमिस्टर झाली की दुसरी !.....फक्त वीकेंड चा हिशोब डोक्यात राहतो....या विकेंडला खऱ्या अमेरिकन संस्कृतीचे विश्वरूपदर्शन क्लब मध्ये घडते ...तरुणाई कडे बघून "क्षणभंगुर ती रात्र होती " असेच वाटत राहते .....तसेच मला नववर्षाच्या पहिल्या दिवशी वाटले
"मागचे वर्ष कधी संपले ते कळलंच नाही....."US मध्ये दिवस कसे जातात कळत नाही"


नवीन सेमिस्टर चालू होणार होती ...नाताळ च्या सुट्टी मधला आळस गेला नव्हता (घालवायचा पण नव्हता ..;))माझी प्रार्थना चालू होती.."सांग सांग भोलेनाथ ..."बर्फ पडेल का? अंगणामध्ये बर्फ साठून सुट्टी मिळेल का? "
...आणि ४ दिवस सुट्टी मिळाली."
.:)

फेसबुकच्या वॉल वर सगळेच काहीना काही लिहीत असतात ..ते वाचून मला खूप वेळा समजते की त्याची/तिची मनस्थिती काय आहे किवा कोणाचा काय घोटाळा चालू आहे...;) त्यातूनच एक नवीन म्हण निर्माण झाली "फेसबुकच्या वॉलला(भिंतीला) पण कान असतात "


जानेवारी महिना चालू झाला आणि एक दुःखाची बातमी आली "पंत गेले "(प्रभाकर पणशीकर )...मी त्यांची दोनच नाटके पहिली होती तरी सुद्धा त्यांचा मी निस्तीम चाहता चाहता आहे. ...माझ्या डोक्यात त्याक्षणी आले ......तो मी नव्हेच मधला हा लखोबा लोखंडे साक्षात यमासमोर पण म्हणला असेल" तो मी नव्हेच !"


२ महिन्यापूर्वी एका मित्राचे बेक्कार ब्रेंक अप(complete दोन्ही जीवाची तडफड इ.) झाले...त्याचे मला सारखे फोन यायचे आणि मग माझे अनुभवाचे सल्ले चालू व्हायचे..माझ्या अनुभवाचा एक सल्ला त्याला ऐकवला "Behind every successful man, there is an "Ex Girl friend"..त्यामुळे तो मित्र आत्ता यशस्वी बनायच्या मार्गावर आहे...


शाळेत असताना विश्वास पाटलांचे पानिपत वाचल्यावर मी आनंदीबाईना बेक्कार शिव्या घातल्या होत्या ...त्याच आठवणी परत मागच्या महिन्यात जाग्या झाल्या कारण पानिपतच्या लढाई ला १५० वर्ष झाली होती ....तेंव्हा एक डोक्यात विचार आला ""पूर्वीच्या काळी "स्पेल चेक" असते तर आनंदीबाई कडून "ध चा मा " झाला नसता ....आणि मराठे शाही वाचली असती..."


असे हे माझे स्टेटस मेसेज चे प्रयोग चालूच असतात ..त्या खाली येणाऱ्या comments वाचून हसून हसून मी संपून जातो...यामुळे माझा खूप मित्रांशी संवाद वाढला आहे ...ते नुसते लिस्ट मधले फोटो न राहता माझे मित्र बनून रोज समोर येतात.....