सोमवार, ११ एप्रिल, २०११

नजरेला भावते ते सर्वकाही...

पहिल्या पावसानंतर सांज खुलते अगदी तसेच रंग काल आकाशाने धरले होते. आज ऑफिस मधे असताना सरी यायला सुरवात झाली. आंब्यांसाठी हळहळ पण तरीही थंडाव्याने आम्ही सुखावलो होतो. ६.३० ला सुटले तशी गाडी जोरात हाकत घरी आले आणि तडक गच्चीत गेले. पुण्यात सहकार नगरला जरा डोंगरावरच घर असल्याने गच्चीतून जवळजवळ निम्मं पुणं दिसतं. पाऊस सुरु झाला तसं टप्प्याटप्प्याने भिजणाऱ्या पुण्याला बघताना मनोमन मी पण भिजत होते. अशा वेळी लाईट गेले तर ढगांचे गुलाबी केशरी रंग आणि मधेच कडाडणाऱ्या विजेच्या लखलखाटात कितपत दूर शहर दिसतंय हे बघायचा पोरकट प्रयत्न होतो.

लिफ्ट रूम च्या बाजूला पायरी वर बसून तासन तास आपल्या शहराकडे बघत बसायची लहान असल्यापासून सवयच जडलीये मुळी. सहकार नगर तसा शांत भाग असल्याने अजूनही मागे पाचगाव पर्वती च्या जंगलातल्या मोरांचा सकाळी आवाज कानी पडतो. हळू हळू वर्दळ सुरु होते तरीही आमच्या इथे प्रचंड शांतता असते. सकाळच्या कोवळ्या किरणात पुण्याला जागे होताना बघायला बऱ्याच वेळा मी गच्चीत धाव घेते. लालबुंद सूर्याचा गोल वर येताना खोलवर मनात मृत्युंजय मधले शब्द आठवतात. दोन गल्ल्या तरी दूरवरून येणाऱ्या कोकिळेचा आवाज अजून साद घालतो. सात वाजायला येतात तोवर आईने स्वयंपाकघराच्या खिडकीत टाकलेले दाणे खायला रानटी पोपट धुमाकूळ घालतात. उन्हाळ्यात फुललेल्या पिवळ्या बहाव्यावर हे मनसोक्त राज करतात. हिवाळ्यात सकाळी सकाळी रोज भारद्वाज जोडीने दर्शन देतात. थंडीत घुमणारा भोंग्याचा आवाज ऐकताना शहराची वर्दळ दिसली नाही तरी जाणवते.

मुंबईला असताना हाच अनुभव फक्त गच्ची नाही तर बाल्कनी मधून आम्ही घ्यायचो. मरीन ड्राईव्ह चे सौंदर्य खुलून दिसणारी वेळ म्हणजे समाची वेळ. भरती आणि ओहोटीच्या मधे पाणी जेव्हा काही काळ स्थिर होते ती. सकाळच्या धुक्यातली जीवाची मुंबई तेव्हा बघताना एखाद्या डोंगरातल्या कुशीतल्या गावाप्रमाणेच शांत जाणवते. सकाळी चार वाजता पहिल्या लोकल चा, मरीन ड्राईव्ह वरचा हळू हळू वाढणारा गाड्यांचा आवाज या शहराची आठवण बनून राहून गेलाय आता.

पुणे असो की मुंबई किंवा अहमदाबाद, सूर्यास्ताचे आकाश कुठेही मला वेड लावते. निरनिराळ्या रंगांचा रोज एक नवीन कॅनवास आणि रात्री त्या शहराचा उजाळा बोल्ड करणारा त्याच आकाशाचा काळाशार पट्टा.. समेच्या वेळी क़्विन्स नेकलेस चे प्रतिबिंब त्या समुद्रात बघत होस्टेल च्या बाल्कनीत किती तरी वेळ आम्ही बसले असू. जणू inception सिनेमा अनुभवल्या प्रमाणे. पुण्यात पर्वती वरून, आमच्या घराच्या गच्चीतून, चांदणी चौक मधल्या up and above मधून थंडगार वाऱ्याच्या सोबतीने शहराकडे अनेकदा शांतपणे बघत बसणे माझा आवडता विरंगुळा आहे. गच्चीतून सरळ समोर दुरवर नजर टाकली की सिटी प्राईडचे लोगो मधले तारे लुकलुकताना दिसतात.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे वरून जर कधी रात्री येणं झालं तर दोन कमालीच्या धकाधकीच्या शहरांना जोडणाऱ्या सुपरफास्ट हायवेच्या घाटातून खोपोली गाव बघणं कितीही टिपिकल असलं तरीही आपलं मन शांत होताना आणि एक वेगळाच आनंद अनुभवल्याचं जाणवतं. प्रवास बसचा असो वा ट्रेनचा, कुणास ठाऊक मागे पडणाऱ्या झाडांना बघणे मला फार भावते. २-३ सेकंदासाठी फक्त आपल्या आयुष्याचा भाग होऊन ती तशीच उभी असतात. अंगणातल्या बागेतल्या झाडांना रोज काळजी घेऊन पण ती जेवढी टवटवीत असतात त्यापेक्षा ही झाडे मला जास्त टकमकीत वाटतात. पुणे-जळगाव प्रवास सध्या स्लीपर बस ने होत असल्याने एरवी न दिसणारे लाखो तारे झोप येऊच देत नाहीत.

देओतीब्बाच्या ट्रेकला एका कॅम्प जवळ आम्ही एक झकास जागा शोधून काढली होती. झऱ्याच्या पाण्यामध्ये एका आडवा मोठ्ठा खडपावर आम्ही निवांत पडी टाकायचो. बोचरा वारा आणि पाण्याची झुळझुळ.. डोळे उघडल्यावर दूरवर दिसणारी बर्फाशी शिखरे.. खरंच एक प्रकारचा निर्वाणा आहे.

लहानपणी आत्या कडे अलिबाग जवळ आवास नावाचे छोटेसे गाव आहे, तिकडे एकदा पौर्णिमेच्या आसपासच्या दिवशी रात्री समुद्रावर भटकायला गेलो होतो. पांढऱ्या शुभ्र प्रकाशात चमकणारी समुद्राची वाळू व फेसाळणाऱ्या लाटांनी मला कितीतरी वेळ एकाजागी स्तब्ध उभे करून ठेवले होते.. मी मागे पडल्याने नंतर आई चिंतेने पण फटकारत घरी घेऊन गेली त्यानंतर कधी रात्री फिरायची वेळ नशिबात आली नाही.

आता मोठे झालो तेव्हापासून परत एकदा अशाच एका किनाऱ्यावर जायचा मानस आहे.. ऑटोकॅडच्या zoom in-zoom out मधून चार क्षण बाजूला काढून.. सुट्टीचे अगदीच जमले नाही तर गच्ची आहेच..

रविवार, १० एप्रिल, २०११

माझ्या गावाची लाईट ट्रेल फोटोग्राफी...

सेमिस्टर संपायला आली आहे त्यामुळे सगळी कडून आवळलो गेलो आहे....शेवटी परवा "गेले सगळे खड्यात !" असे म्हणून कॅमेरा घेऊन बाहेर पडलो....कुठे जाणार काहीच नक्की नव्हते....

असच १ मैल चालत चालत एका पुलापाशी पोचलो...तो पूल आमच्या कुकविल मध्ये नॉर्थ विलो रस्त्यावरून जातो... बाजूच्या गवतातून कसे बसे चढून (पोलीस मामा कडे लक्ष ठेवून :)) वर पोचलो आणि वेडा झालो.....
दोन्हीबाजुला किर्र झाडी ...त्यात रेल्वे रूळ अदृश्य झालेले ....खालून ८० मैलाच्या वेगात गाड्या जात आहेत.....वरती चढून त्या रस्त्याला बघून मी ओरडलो.."कुकवील चा किंग कोण ?"...

जोरात जाणाऱ्या गाड्या मला नेहमी hypnotize करतात...तीच गत माझ्या कॅमेराची पण झाली...."long exposure " फोटोग्राफी चालू झाली....सोप्या शब्दात " कॅमेरा चे शटर जास्त वेळ उघडे ठेवायचे आणि फुकटचा प्रकाश येऊ द्यायचा !" ..हे करून नंतर जे पिकासो चे चित्र होते त्याला तोड नसते...

मस्त पैकी tripod लावला आणि चालू झालो....माझ्याकडे SLR कॅमेरा ( माझा कॅमेरा Nikon 90 !) नसल्याने जास्त प्रयोग करता आले नाही...जास्तीत जास्त शटर ८ सेकंद उघडे ठेवू शकलो...

बेक्कार ओवरटेक कसा करायचा हे माझ्या मी पुण्याचा असल्याने रक्तात आहे...पण पहिल्यांदाच प्रकाश रेषेचा ओवरटेक बघत हतो...



पुणे-ठाणे डेक्कन एक्सप्रेस ने प्रवास करतना घाटामध्ये रुळाचे सांधे बदलताना बघणे म्हणजे सोनेपेसुहागा ....तश्याच प्रकारचा अनुभव माझा कॅमेरा टिपत होता...



दोन समांतर रेषा एकमेकांना मिळत का नाही ? .....नसतील मिळत....असतो एकेकाचा स्वभाव...;)
इति ...पुलं ( बिगरी ते म्याट्रिक )



शाळेच्या मैदानात सगळे सरळ पळताना एक चुकार मुलगा जशी मधेच कल्टी मारतो ..तशीच ती लाल रेषा कल्टी मारते आहे...



चौकामध्ये तर अजून मजा होती....कसा फोटो येईल याचा काहीच अंदाज येत नव्हता...जेंव्हा ८ सेकंदाने फोटो यायचा तेंव्हा तो पिकासोचे abstract बनून बाहेर यायचा..



मेक्सिकन होटेलची Neon sign मला तुफ्फान आवडते...त्यांनी एका कॅक्टस मध्ये अख्खा मेक्सिको उभा केला आहे .

मंगळवार, २९ मार्च, २०११

३२-१

महिन्यातून दोन तीन वेळा तरी पडणारे माझे एक भयानक स्वप्न, भूताला पण मी एवढी घाबरत नाही एवढं. तशी मला झोप खूप प्रिय पण खडबडून जाग आणणारं, रग-चादर-उश्या बाजूला फेकून देऊन तडमडत आरश्यासमोर आ वासून उभं रहायचं आणि तपासायचं, आपले सगळे दात जागेवर आहेत की नाही..
हो, अगदी समोरच्या दातापैकी एक पडल्याच्या या स्वप्नाची मला बेक्कार भीती वाटते. तसा माझा चेहरा हसरा असल्याने त्यात एक खिडकी पडलेली दिसणं कितीही गाढ झोपेतून मला उठायला लावतं.

आमचे नात्याने दूरचे पण तरीही जवळचे जोडपे dentist आहेत. त्यांचं क्लिनिक आमच्या घराजवळच असल्याने बऱ्याचदा भेट होते. पेशंट बनून गेलो नाही इतक्या वेळा गप्पा मारायला गेलो असू. पण पहिल्यांदा वेळ आली बाबांची. त्यांचं root canal करायच्या वेळी. त्यांचा सगळाच प्रकार खूप किचकट असल्याने जवळजवळ एक महिना यात गेला. नक्की root canal करताय की canal खणताय असं सहज मजेत मी त्यांना विचारलं होतं. त्यांनी चिल मधे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, पण ऐकून वाट माझी लागायची. एका वेळी चार dentist लोकांनी आपापले डोके खाजवत हे सगळे शेवटी पार पाडले तरीही आमच्या बाबांचा चेहरा शांत.

पुण्यात आल्यावर आपल्या सगळ्या नातेवाईकांना मला भेटवणे आमच्या बाबांचा आवडता छंद. माझे thesis झाल्यानंतर सुट्टीत सहज परत ताई कडे जायचा योग आला.पण नंतर इंटर्नशिपमुळे जवळ जवळ तीन महिने भेटणं झालं नाही.

दोन दिवसापूर्वी शेवटची पूर्ण बाहेर न आलेली अक्कलदाढ जरा त्रास द्यायला लागली. सगळं काही ठीक आहे की नाही ते बघण्यासाठी आम्ही ताई कडे गेलो. आतुन मी थोडीशी घाबरलेलीच होते. पण धीर धरत मी तिच्या क्लिनिक मधे पाऊल ठेवले. एका सर्जरी नंतर हुश्श करत माझा चेहरा बघून ती थोडी सुखावली होती. सध्या काय चालू आहे तेव्हा इंटर्नशिप उत्तर ऐकून तिने माझे अगदी (आनंदाने) प्रोफेशनल स्वागत केले. आई बाबा बरोबर असल्याने साहजिकच गप्पा सुरु झाल्या. काही वेळाने त्या माझ्या भविष्यावर येऊन टपल्या. लग्नाच्या गोष्टी सुरु झाल्यावर "माझी दाढ दुखतेय जरा बघ ना" म्हणत मी विषय बदलला. पण लगेच तिने आपली equipments काढून चेकअपला सुरवात केली. तिच्या लक्षात आले की येणारी दाढ तिरकी येतेय. तिची जागा आणि वाढ बघता पुढे त्रास होणार तर आत्ताच काढून टाकलेली बरी असा सल्ला ताईने दिला.

माझ्यावर टाईम बॉम्ब पडला...

काहीच त्रास होणार नाही, खूप साधी case आहे वगैरे सांगून मला धीर देण्याचा असफल प्रयत्न तिघांनी केला. माझी नकाराची घंटा सुरु झाली. येत्या शनिवारी आटपून टाकू बाबांनी शांतपणे तिला सांगत आम्ही निघालो. ही माझी पहिलीच वेळ असल्याने भीतीने डोळ्यात पाणी टिकेना. खराब मूड सांभाळायला मला वैशाली मधे नेण्यात आलं. आयुष्यात पहिल्यांदा इडली माझ्या घशाखाली उतरत नव्हती. नंतर एका लहान मुलाला देतात तसं icecream पण देण्यात आलं. बरोबरच होतं म्हणा, मी लहान मुलासारखीच वागत होते.

रात्री फोन वर एका मित्राशी बोलताना पण भीती कमी होत नव्हती. पहिले मजेत बोलताना समजवायचा प्रयत्न झाला. तोंडात liquid nitrogen भरून सगळं गोठल्यावर एका बुक्कीत फत्ते.. वगैरे.. पण माझ्या डोक्यात ही भीती फेविकॉल सारखी चिकटली होती. रात्रभर झोप नावाचा प्रकार माझ्या खोलीत फिरकला नाही. खरंतर झोप उडण्याएवढी मोठी गोष्ट नाही ही पण का कुणास ठाऊक माझ्या डोक्यातून हा विचार गेला नाही. काही स्वप्न खरी होतात असं ऐकलंय. तशी बरीच झाली आहेत पण याची भर नसती तर चाललं असतं असं रात्रभर देवाला ओरडून ओरडून सांगावसं वाटलं. सकाळी दात घासताना लवकरच आपली ३२-१ एकतीशी उरणार आहे ते सहनच होत नव्हतं. पण ९०% स्वप्न खरं होणार नसल्याने म्हणजे समोरच्या ऐवजी मागचा एक दात कमी होणार असल्याने जरा हायसे वाटले..

आता शनिवारी वर्ल्ड कप फायनल बरोबर आमची पण लढाई रंगणार आहे. बघू, कशी वाट लागते ते.....

शुक्रवार, २५ मार्च, २०११

पुळचट रिआलिटी शो चा शो ऑफ !!!!!

एकडे टेनेसी आल्यापासून माझे टीव्ही पाहणे खूप कमी झाले आहे...म्हणजे मी भारतात असताना जास्त बघायचो असे नाही....पण animal planet,Nat Geo आणि Discovery यात बेक्कार जास्त रमायचो...येथे या वाहिन्यावरती कुत्रे आणि मांजरांचे सगळे कार्यक्रम असतात त्यामुळे माझ्या सारख्या जंगली प्राण्याला ते पाळीव कार्यक्रम बघवत नाहीत....

दुसऱ्या वाहिन्यांवर "रिआलिटी शो" नावाचे भयानक प्रकार चालू असतात....या मध्ये वेगळे वेगळे प्रकार पण असतात...

समाजाने सोडून दिलेल्या ,वाया गेलेल्या मुली एका घरात कोंबायच्या आणि त्यांना मांजरी(मांजरी पेक्षा कमी कपडे असतात त्यांचे ;)) सारखे भांडायला लावायचे..मग तयार होतो "Bad Girls "
असेच मुलं मुली एकत्र टाकायच्या की झालं "Jersey Shore"..
शाळेतल्या मुलांचा अजून बिभत्स प्रकार म्हणजे "Skins"... माझ्या तरुण वयाला पण हे शो एकटे बघताना पण लाज वाटते...मी आई-बाबांबरोबर तर हे शो बघणे कल्पना पण नाही करू शकत......

हे झालं अमेरिकेमध्ये पण भारतात पण या वरुनच "बिग बॉस" निघतो...त्यात पण अशीच निर्लज्ज माकडं एका घरात भरतात.... त्यांचे माकडचाळे वाहिनीचे TRP वाढवतात...
राखीच्या स्वयंवरात लग्नाचा बाजार मांडला जातो...
"रोडीज" लावले की "पिप पिप" सोडून काही ऐकू येत नाही...या रोडीज मध्ये राग व्यक्त करायला एवढ्या शिव्या का द्याव्या लागतात मला अजून समजले नाही...त्या रोडीजचे टास्क म्हणजे तर मला विनोदच वाटतो...पेटीमध्ये परप्रांतीय मुलीला(मराठी मुलीला मी तरी कधी पहिले नाही अजून...;)) झोपवून तिच्या वरती पाण्यातले साप सोडून किवा झुरळे सोडायचे आणि तिच्या इंग्लिश किंचाळ्या लोकांना ऐकवायच्या ..असे सगळे गरीब प्रकार !.....यात तर मला त्या सापांची आणि झुरळांची दया येते...("त्यांनी मागच्या जन्मी पाप केले म्हणून या जन्मी रिआलिटी शो मध्ये काम मिळाले !")

असे अनेक कार्यक्रम रिआलिटी शो च्या नावाखाली सुशिक्षित लोकं उत्साहाने बघत असतात... यामध्ये रिआलिटी कुठे येते हे त्याचं त्यांनाच माहित...हीच गोष्ट जेम्स वेलस्ली त्याच्या "रिअल" या गाण्यातून सांगतो...आपण जे आयुष्य जगत असतो ते या रिआलिटी शो मध्ये कधीच दाखवत नाहीत....जे काही दाखवतात ते रिआलिटी च्या जवळपास पण जात नाही...म्हणूनच हे गाणं आपल्याला खूप शांतपणे आपल्याला खऱ्या रिअलिटी कडे घेऊन जाते...



रिआलिटी शो च्या एका भागामध्ये ती मुलगी "तो" तिच्या प्रेमाला उत्तर देत नाही म्हणून रडते ...पुढच्या मध्ये ते दोघे एकत्र येतात ( ते कसे जवळ येतात आणि काय काय करतात हे देशा-देशावर अवलंबून आहे...;))...नंतरच्या भागामध्ये तो तिला सोडून जातो .....मग प्रेमभंगाचे नाटक आणि दुसऱ्याच्या खांदा ... शेवटी येरे माझ्या मागल्या ...

याला थोडीच रिआलिटी म्हणतात....?

५७ वर्षाचा सुखी संसार करून आपली बायको आपल्या खांद्यावर शेवटचा श्वास घेते... तेंव्हा जे प्रेम वाटते ...एकटे वाटते ...भीती वाटते ..."ते सगळे रिअल....आणि शेवटी ती देवाकडे जाताना तिचे आपल्या डोळ्यात बघणे ती रिआलिटी...!"

आपल्या आजूबाजूचे लोकं,गृहिणी असे रिआलिटी शो सारखे कपडे कधीच घालत नाही .....किंवा त्यांच्या डोक्यावर cowboy hat घालून त्याच्या अंगात धाडस येत नाही..... त्यांचे धाडस म्हणजे महिन्याच्या शेवटी कसे पण करून आहे त्या पैशात "दुध ,पेपर,लाईट ,पाणी बिल भरायचे आणि कुंटुबाला सुखी ठेवायचे ......"हीच ती रिआलिटी आणि हेच त्यांचे खरे धाडस ....."

(२६ जुलै चा )मुंबई चा मुसळधार पाऊस त्यातून survive होऊन लगेच ऑफिस ला जाणारे मुंबईकर...जपान मधला ११ मार्च चा भूकंप त्यातून एकमेकांना आधार देणारे जपानी लोकं..
"अशीच कोणतीही जीव घेणारी नैसर्गिक आपत्ती म्हणजे रिअल आणि तिच्याशी मरेपर्यंत लढणारे लोकं म्हणजे रिआलिटी...."

आर्थिक मंदीमुळे नोकरी जाणे ...पैसे नसल्यामुळे राहते घर विकायची वेळ येणे ..बायको-मुलांना रस्त्यावर यावे लागणे .. असे अनेक अवघड संसारिक प्रश्न ...आणि त्याची उत्तरे शोधणारी माणसे ...
"हेच प्रश्न म्हणजे "रिअल" आणि त्यांना भिडणारी माणसे म्हणजे रिआलिटी...!"

जेम्स आपल्या सगळ्यांना मनातून वाटतेच तेच त्याच्या गाण्यात सांगतो...
त्यामुळे अगदीच तुम्हाला रिआलिटी बघायची इच्छा झाली तर Danny Boyle चा "127 hours " बघा ....अनुभवायची असेल तर सोमवार ते शुक्रवार मध्ये सकाळी ८३५ ची CST लोकल ठाण्यावरून पकडा किंवा पुण्याच्या नाविपेठेतल्या विठ्ठल मंदिराच्या ट्राफिकमधून संध्याकाळी गाडी बाहेर काढा....पण हे पुळचट रिआलिटी शो बघणे बंद करा....!

मंगळवार, २२ मार्च, २०११

एका रस्त्यावरचे आयुष्य


नेताजी सुभाष रस्ता हे माझ्या आयुष्यातलं एक सुरेख पर्व आहे. 'जे.जे. आर्किटेक्चर'ला असताना माझी admission इथल्या सरकारी होस्टेलला झाली. ४०,००० रुपये स्क्वे.फूट च्या जागेत ६ महिन्याला फक्त ४,००० रुपये देऊन राहायला मिळत असेल हे ऐकून कोणीही वेड्यात काढेल. अन् सुभाष रस्ता सांगितलं तर ... एक मिनिट.. मरीन ड्राईव्ह, क्वीन्स नेकलेस म्हणजे आपला मराठीत नेताजी सुभाष रस्ता..!!

मित्रहो .. जळफळाट झाला का जरा..??

नेकलेस च्या साधारण मध्यभागी आमचं होस्टेल.. हो.. हे मी आणि इथे राहणाऱ्या बऱ्याच मुलींच्या आयुश्यातलं एक गोड सत्य आहे. ५ मजली जुन्या मॉडर्न स्टाईलचं बांधकाम, समोर दररोज एका नवीन ठेवणीचा निसर्गाचा wallpaper, आकाशाची निळाई, समुद्राचं खारं वारं.. किनारा म्हणता नाही येणार पण त्याप्रमाणेच थोडीफार भासणारी चौपाटी. रात्री दिवांची माळ अन् सुसाट जाणाऱ्या गाड्या... बऱ्याच लोकांनी केलेल्या या वर्णनाला अजून मी तरी किती शब्द वाढवणार म्हणा.

पहिल्या वर्षाला असताना खूप उड्या मारत आम्ही सगळ्या मुली इथे आलो. तेव्हा बराच वेळ असायचा मग बऱ्याच वेळा संध्याकाळी आम्ही walk ला जायचो. रोजचा सूर्यास्त बघायचा, समोर बसून चकाट्या पिटायच्या की दिवस संपला.

दुपारी भर उन्हात हाल व्हायचे. बस थांबा सोडला तर सावलीला फक्त नारळाची झाडं. इथेच संपलंय सगळं. त्यामुळे taxiमधून उतरताना सिग्नल हिरवा होईपर्यंत उन्हाचा अगदी ताप यायचा. सिग्नल मोडणं इथे जरा जीवाला धोकाच. तरीही दीडशहाणे लोक असतातच. भरधाव वेगानं जाणाऱ्या वाहनांच्या मधे येणं आम्हाला धजावायचं नाही. त्यामुळे ज्या दिवशी सिग्नल बंद किंवा खराब असेल तेव्हा बेक्कार कसरत व्हायची.

रविवार म्हटला की मरीन ड्राईव्हला जत्रेचं स्वरूप असतं. बड्या लोकांपासून सामान्यापर्यंत सर्वजण येथे दिसतात. फरक फक्त त्यांच्या पोशाख आणि गाड्यांमधे असतो. बड्या brand च्या कार आणि बाईक बघणं ज्यांचा छंद त्यांना तर पर्वणीच. रोज कितीही वेळ रहदारी कडे बघितलं तरी कसा वेळ जातो कळत नाही. होमसिक झालं की खिडकीबाहेर टक लावून बघत बसायची सवयच लागली. कैवल्यधाम मधे योगा करताना ताडासनाच्या वेळी क्षितिजावर मंद गतीने हलणाऱ्या cargo ships वर नजर खिळायची. आजची किती मोठी, कालची किती छोटी, एका वेळी किती पहिल्या, कोणती जोरात पुढे गेली, कोणती किती वेळ एकाच जागी आहे या चर्चा नंतर रंगायच्या. पुढे पाचव्या वर्षाला thesis topic चा प्रोजेक्ट मी जेव्हा automobile museum निवडला त्याचा पाया या रस्त्याने आधीच घालून ठेवला होतं जणू.

पावसाळा आला की समुद्राचे ते उधाण रूप बघायला मजा यायची. आकाशाप्रमाणे रंग बदलणारं पाणी, सुसाट वारा की आपणच उडून जाऊ आणि भरतीला tetrablock वर फुटणाऱ्या उंच लाटा. ही लाट जेव्हा ४.५ मीटर पेक्षा उंच येणार असं हवामान खाते सांगते तेव्हा तर तांडवच. पण तेच ओहोटीला दुरवर पसरलेला कचरा बघून वाईट वाटायचं. दिवसातून दोन वेळा ओहोटी असा संपूर्ण पावसाळा महापालिकेचे कर्मचारी रस्ता साफ ठेवायचे. थोड्या वेळाने येरे माझ्या मागल्या.  मार्ग नाही पण ते त्याला कधीच नाही म्हणत नाही.

मुंबईचा पाऊस आला तर मुसळधार, नाहीतर एक थेंब नाही. तुरळक सरी नावाचा प्रकार नाही. त्यात भरतीची वेळ असेल तर सोसाट्याचा वारा.. छत्री शक्यतो न उघडलेलीच बरी. संपूर्ण काडीची तरी ठीक पण फोल्डिंग ची असेल तर garantee फक्त ५ मिनिटाचीच आणि तुम्ही चिंब भिजणार हे नक्की. तरीही हौसेने भिजायला येणाऱ्यांची संख्या पण काही कमी नाही. पावसाचा आवाज आल्या आल्या होस्टेलच्या खिडक्या बंद करणे म्हणजे roadies पेक्षा अवघड टास्क. जुन्या लाकडी खिडक्या वाऱ्यामुळे आत ओढताना हालत खराब व्हायची. तोपर्यंत पाणी आत आलेले असणार. वर कष्टाने बंद करण्यात सफल झालो तरीही waterproofing वरचा भरवसा कधीच उठला होता. (सरकारी काम शेवटी) कॉलेज मधून आल्यावर ओले कपडे वाळवणे, पाण्यापासून laptop आणि submissions वाचवणे यासाठी इस्त्री आणि पंखाच मदतीला धावायचा. उन्हाळ्यात पण एवढं विजबील येत नसेल तेवढं पावसाळ्यात येत असेल आमच्या होस्टेलचं.. :) पण याचा वैताग कधीच नाही आला.

एरवी mobile वर पर्सनल गप्पा असतील तर आमची बाल्कनी आम्हाला फार प्रिय. रात्री- अपरात्री बऱ्याच वेळा आम्ही बाल्कनीत उभे राहायचो. थोडा ट्राफिक चा जोर कमी असायचा. या वेळी शांतपणे लाटांचा आवाज ऐकत आमच्या बाकड्यावर आम्ही सांडायचो. submissions च्या वेळी मधेच विरंगुळा म्हणून आपापल्या रूम सोडून आम्ही शांतपणे बाल्कनीत गप्पा मारायचो. रात्री टवाळक्या करणारी पोरं मोठ्याने बळच "पूजा" नावाने ओरडायची. उगाच.. अंगात मस्ती...

गणपतीची मिरवणूक बघायला आमची टेरेसवर वर गर्दी व्हायची. दुरवर अडकलेलं ट्राफिक, वाजतगाजत नेणारे गणपती, हेलिकॉप्टरमुळे समुद्राच्या पाण्यावर आलेली वलय आणि एका वेगळ्याच जोशाने सजलेले मुंबईकर, vintage car rally याची देही याची डोळा अन् ते पण घर बसल्या, मंत्र्यांच्या भरधाव जाणाऱ्या गाड्यांचा ताफा अन् शुटींग च्या भोवती माणसांचा घोळका असे कितीतरी क्षण.
 
वर्षातला एकाच दिवस असतो जेव्हा इथे "pindrop silence" असतो. तो दिवस म्हणजे marathon चा दिवस. या दिवशी ट्राफिक दुसऱ्या दिशेला वळवले असते. जिमखाना मैदानावर बऱ्याच वेळा मोठ्या घरातले लग्न समारंभ होतात. त्यांची नयनरम्य आतिषबाजी अगदी फुकट बघायला मिळते. वानखेडे, ब्रेबॉर्नला कधी क्रिकेटचा सामना असेल तर मग विचारायलाच नको. लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत (आणि त्यांची कुत्री सुद्धा) येथे वेळ दवडायला पुढे मागे पाहत नाहीत.

मधेच एखादा करकचून ब्रेक दाबायचा आवाज आला की काळजाचा ठोका चुकायचा. उघड्या डोळ्याने पाहिलेले ओबेरॉय चे स्फोट व चौपाटीवरच्या encounter नंतर दारूगोळ्याच्या वासाने आजही अंगावर शिरशिरी येते. एरवी दिमाखाने उभे असणारे ओबेरॉय होटेल त्या रात्री काळोखात गुडूप झाले होते. ४ दिवस होस्टेल ला दबकूनच होते सगळे. सर्व न्यूज, वर्तमानपत्र वाचून, मोबाईल वर शेकडो काळ्जीस्वरांना उत्तरं देता देता धीर संपत होता. दुसऱ्या दिवशी चील मधे जॉगिंग करताना मुंबईकरांनी एक वेगळाच धडा आम्हाला शिकवला.

उत्सव, rally, सर्व ऋतू, accidents अशा कितीतरी गोष्टी सामावून घेऊन या मरीन ड्राईव्हने तिथला ऐकन् एक क्षण एखाद्या स्वप्नाप्रमाणे फुलवलाय अन् बरेच काही शिकवलेय.. कदाचित आत्ताचे काही क्षण माझ्या कॅमेरातून आणि पोस्ट वाचून तुम्हाला सुद्धा ते अनुभवता आले असतील...!!

बुधवार, १६ मार्च, २०११

कितीतरी गोष्टी .... उन्हाळ्याच्या...!!

पुण्याचा उन्हाळा म्हणजे रखरखीत ऊन अन् दुपारी गरम झळा  पण संध्याकाळ होताच मंद थंड वारा..!!

कोकिळेची तान.. टेरेस मधे खारीचा नाच.. पोपटांचे थवे.. हल्ली कधीतरीच चिमण्यांचा चिवचिवाट.. मालकाबरोबर "walk"ला निघालेली कुत्र्याची पिल्लं.. मधेच गुल होणारी मांजरं.. पाचगाव पर्वती वरचे रोज दिसणारे मोर..  .. .. कितीतरी गोष्टी ..!!

झाडावरच्या कैऱ्या.. करंडीतले आंबे.. शाळेबाहेर आजींकडच्या चिंचा.. समोरच्या गाड्यावरचा बर्फाचा गोळा.. रेशनवाल्या काकांकडे चोरून खाल्लेला पेप्सीकोला.. लाल कापडावरची कलिंगड फ्रूट डिश.. कावरे, सुजाता, गणू शिंदे.. दुपारी घंटी वाजवत येणारा कुल्फीवाला.. लस्सी, ताक, मठ्ठा, ज्यूस, थंडाई, मिल्कशेक, सरबत.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

१०वी १२वी च्या परीक्षा.. engineering च्या सुट्ट्या.. ऑफिस मधली प्रोमोशन्स.. २८ फेब्रुवारीचं बजेट.. आयुकाची फ्री ट्रीप.. industrial new year.. मराठी गुढीपाडवा.. होळीचा चटका.. रंगपंचमीचा ओलावा.. एप्रिल चे fools.. मे चा अभिमानी कामगार.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

 डोक्यावर स्कार्फ, नखशिखांत त्वचा सूर्यापासून वाचवणाऱ्या मुली.. सनकोट gloves ची खरेदी करणाऱ्या असंख्य बायका.. हेल्मेट , गॉगल चढवून फिरणारी मुलं... AC चालू ठेवून थंडपणे कार चालवणारी माणसं.. छत्री सावरत डुलत डुलत जाणारे आजीआजोबा.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

सुट्ट्यांचं कधीही न संपणारं planning.. कधीतरीच confirm होणारं रेल्वेचं तिकीट.. शेवटी आपलीच गाडी काढून केलेल्या कोकणसहली.. महाबळेश्वर माथेरान च्या strawberries.. water kingdom च्या फेरी.. समुद्रात डुंबायची लहान्यांची मजा... मोठ्यांच्या सूर्यास्ताच्या आठवणी.. .. .. कितीतरी गोष्टी ..!!

morning walk नंतर वाडेश्वर ला जमलेली गर्दी.. कॅडबी बाहेर जमलेली कितीतरी टोळकी.. जास्तीत जास्त softy खाण्याचा पैजा.. रात्री पाण्याच्या टाकी शेजारी मित्रांच्या न संपणाऱ्या गप्पा.. मग  तो वळवाचा पाऊस.. गाड्या काढून भिजत दुरवर भटकणारी तरुणाई.. घरीच गरम गरम भजींवर ताव मारणारी मागची पिढी.. चिंब भिजून खायची नुकतीच तळलेली जिलेबी.. शेवटी पोट भरून उरणारी चेतन्य च्या पराठ्याची कहाणी..  .. .. कितीतरी गोष्टी ..!!

धरणीला भेगा.. पाण्याच्या रांगा.. विजेचा लपंडाव.. कागदाचे पंखे.. नेमके त्याच वेळी world cup चे सामने..  सरकारला शिव्या   .. .. कितीतरी गोष्टी ..!!

पण शेवटी शांत होणाऱ्या मातीचा सुगंध..... अश्याच .. .. .. कितीतरी गोष्टी ..!!